मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण : चांगल्या प्रतिसादामुळे यापुढेही राबविणार
पणजी : प्रशासन जनतेपर्यंत पोहोचून त्यांची अडलेली कामे पूर्ण होण्यासाठीच ‘जनता दरबार, सरकार तुमच्या दारी’ हे उपक्रम हाती घेतले आहेत, त्यात कोणताही निवडणूक स्टंट नाही. हे उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केले. आमदार एल्टॉन डिकॉस्ता यांनी दोन्ही उपक्रमांबाबतचा प्रश्न विधानसभेत विचारला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. सावंत बोलत होते.
येत्या सोमवारी उपक्रम
येत्या सोमवारी 14 ऑगस्ट रोजी हाच उपक्रम म्हापसा व मडगाव येथे होणार असून तेथे अनुक्रमे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो व पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे हजर राहून जनतेचे प्रश्न सोडविणार आहेत, असे त्यांनी पुढे बोलताना नमूद केले.
खर्चात मोठी तफावत कशी?
डिकॉस्ता यांनी सदर उपक्रमाबाबत शंका उपस्थित केली. एका जिह्यातील उपक्रमात 20 हजार ऊपये खर्च येतो तर दुसऱ्या जिह्यातील त्याच उपक्रमास ऊ. 90 हजार खर्च होतो. ही तफावत एवढी मोठी कशी काय? अशी विचारणा त्यांनी केली.
लोकांना फारसा उपयोग नाही
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी म्हापशातील उपक्रमात 34 तर मडगावातील उपक्रमात 106 लोक उपस्थित होते असे सांगून त्याचा जनतेसाठी फारसा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आणले.
दोन्हीकडे 300 लोकांची उपस्थिती
डॉ. सावंत यांनी ती संख्या प्रश्नकर्त्यांची असून दोन्हीकडे 200 ते 300 लोक हजर होते, असा दावा केला. खर्चाची बिले उत्तरातून देण्यात आली असल्याने त्याबाबत शंका घेऊ नये, असेही डॉ. सावंत म्हणाले.
कर्मचारी कामच करत नाही
खात्याचे अधिकारी, कर्मचारी कामच करीत नाहीत म्हणून हे उपक्रम राबविण्याची पाळी आल्याची टीका डिकॉस्ता, आलेमांव यांनी केली. असे दरबार महाराज करतात असे डिकॉस्ता यांनी सांगून ते बंद करावेत अशी मागणी केली.
महाराज नव्हे, जनतेचे सेवक!
त्यावर उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले की, आम्ही किंवा मंत्री हे महाराज नव्हेत, तर जनतेचे सेवक आहोत. शिवाजी महाराज देखील जनतेचे सेवक होते, अशी टिप्पणी डॉ. सावंत यांनी केली. या उपक्रमांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतो म्हणून ते पुन्हा आयोजित करण्यात येणार आहेत. आम्ही प्रशासन घेऊनच दारात जातो आणि जनतेचे प्रश्न तेथेच सुटतात, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. अनेकांची कामे त्या उपक्रमात होतात, परिणामी त्यांना कार्यालयात येण्याची गरज भासत नाही, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.
उपक्रमांवर 13 कोटींची उधळपट्टी : युरी आलेमांव
‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमांवर सरकारने ऊ. 13 कोटींची उधळपट्टी केल्याची माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी चर्चेच्यावेळी दिली. नेतुर्ली – सांगे येथील कार्यक्रमांवर दोन दिवसात ऊ. 69 लाख खर्च केल्याचे ते म्हणाले. हा खर्च विनाकारण झाला असून प्रशासन कोलमडले असल्याने हे उपक्रम करावे लागल्याचे आलेमांव यांनी नमूद केले. हे उपक्रम निवडणूक जिंकण्यासाठीच करण्यात आल्याचा दावा आलेमांव यांनी केला. सरकारने अशा प्रकारचे सुमारे 12 कार्यक्रम कऊन मतदारांना आकर्षित केले, असा आरोप त्यांनी केला. या उपक्रमांच्या तारखा पाहिल्या तर ते निवडणूक प्रचारासाठीच होते, अशी टीका त्यांनी केली.









