केंद्र सरकारचे प्रतिनिधी आंदोलकांच्या भेटीला : पंतप्रधानांची अमित शहा-शिवराजसिंग यांच्याशी चर्चा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, पटियाला
शेतकरी आंदोलनादरम्यान खनौरी सीमेवर 26 नोव्हेंबरपासून उपोषणाला बसलेले जगजित सिंग डल्लेवाल यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर रविवारी गृह मंत्रालयाचे संचालक मयंक मिश्रा आणि पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव शेतकरी नेते डल्लेवाल यांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झाले. येथे त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते आणि पोलीस अधिकारी यांच्यात बैठक झाली. दुसरीकडे, सरकारी पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपासून या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देत गृहमंत्री अमित शहा, कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान, जे. पी. न•ा यांच्याशी चर्चा करत तोडगा काढण्याच्या दृष्टीने पावले उचलल्याचे समजते.
खनौरी सीमेवर शेतकरी नेत्यांची भेट घेतल्यानंतर गृह मंत्रालयाचे संचालक मयंक मिश्रा म्हणाले की, आम्ही शेतकरी नेत्यांच्या सर्व मागण्या ऐकल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी मी आलो आहे. शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर संचालक मयंक मिश्रा यांनी शेतकरी नेत्याची भेट घेतली आहे. अशा परिस्थितीत आता शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेची दारे खुली होतील, असे मानले जात आहे.
डल्लेवाल यांचे प्राण खूप अनमोल : डीजीपी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही डल्लेवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय मदत देण्याचे आवाहन केले. जगजीत सिंग डल्लेवाल यांचे प्राण खूप अनमोल आहेत. त्यांनी खनौरी बॉर्डर येथे राहून या आंदोलनाचे शांततेने नेतृत्व करणे अत्यंत आवश्यक आहे, असे पंजाबचे डीजीपी म्हणाले. आम्ही जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या प्रकृतीची माहिती मिळवली आहे. मुख्यमंत्री भगवंत सिंह मान हे त्यांच्या प्रकृतीबाबत खूप काळजीत आहेत. त्यांचा संदेश आम्ही डल्लेवाल यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्याशी समन्वय साधून हा प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद पेले.
जगजित सिंग डल्लेवाल हे 20 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत
खनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल 26 नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला बसले असून, गेल्या 3-4 दिवसांपासून त्यांची प्रकृती सतत बिघडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान शेतकरी नेते डल्लेवाल यांच्याशी बोलून त्यांचे उपोषण संपवले पाहिजे, असे सांगितले. त्यानंतर रविवारी अधिकारी त्यांना भेटायला आले होते. डल्लेवाल यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे वृत्त समजताच अनेक नेते त्यांना भेटायला आले.
पंतप्रधानांची मंत्र्यांसोबत चर्चा
शंभू आणि खनौरी सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार रात्री 14 डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मंत्र्यांकडून शेतकरी आंदोलनाची माहिती घेतली आहे. संसद भवनात झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश न•ा उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधानांनी आंदोलनाबाबत बोलून परिस्थितीची माहिती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच पंतप्रधानांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडूनही सविस्तर आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर सरकार सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
शेतकरी आंदोलक मागण्यांवर ठाम
शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी तिसऱ्यांदा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून रोखले. पोलिसांच्या या कारवाईत अनेक शेतकरी जखमी झाले. दरम्यान, 14 डिसेंबर रोजी हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमारही केल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना वारंवार रोखण्याचा प्रयत्न केला जात असला तरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले आंदोलक दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. चालू आठवड्यातही पुन्हा शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीला पाठविण्याचा इशारा संघटनांकडून देण्यात आला आहे.









