अक्षय सौभाग्य प्राप्तीसाठी महिलांकडून प्रतिष्ठापना
प्रतिनिधी/ बेळगाव
सोन पावलांनी घरोघरी गौराईचे आगमन झाले आणि तिची प्रतिष्ठापना करताना महिला हरखून गेल्या. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन झाले. गौराईची प्रतिष्ठापना प्रामुख्याने अक्षय सौभाग्याच्या प्राप्तीसाठी केली जाते.
भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीने असुरांचा संहार केला, तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया ही पूजा करतात. गौरी आणण्याच्या अनेक प्रथा आहेत. त्यामध्ये कलशामध्ये तेरडय़ाची रोपे घालून, पाच खडे घालून किंवा सुगडाची गौर पूजली जाते. त्यामुळेच ग्रामीण भागामध्ये नदीकाठावर महिलांची गर्दी झाली होती.
गौरी आगमनावेळी घरात सर्वत्र हळदीने तिची पावले रेखाटली गेली. परंपरेनुसार काही घरांमध्ये उभ्या गौरी सजविण्यात आल्या. श्रावणामध्ये बसविलेल्या गौरीच्या पोटामध्ये पिवडीमध्ये भिजविलेले धागे घातलेले असतात. आता सोमवारी गौरीची पाठवणी करण्यापूर्वी महिला हे धागे बांधून घेतील.
गौरी आगमनासाठी महिला विशेष तयारी करतात. कोणी पाटावर किंवा तांदुळ किंवा गव्हाच्या राशीवर गौरी उभ्या करतात. कोणी स्टॅन्डवर गौरीचा मुखवटा ठेऊन रेशमी साडी नेसवून गौरी उभ्या केल्या. बहुसंख्य ठिकाणी लहान मुली डोक्मयावर कलश घेऊन गौरीसह घरात प्रवेश करत असल्याचे दृष्य पाहावयास मिळाले. शुक्रवारी गौरीसाठी मिश्र पालेभाजी आणि भाकरी असा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यामुळे पालेभाज्यांचे दर वधारले होते.
गौरी पूजनासाठी अनेक फुलांची आरासही केली जाते. त्यामुळे केवडा, कमळ यासह गुलाब, जास्वंदी, शेवंती आदी फुलांची आवक वाढली होती.









