25 हजार रुपयाचे नुकसान
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
गौंडवाड शिवारातून गेलेल्या थ्रीफेज विद्युत तारांच्या स्पर्शाने ठिणगी पडून चार ट्रॅक्टर गवत जळून खाक झाल्याने 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. हरिश्चंद्र रामा चौगुले असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे. अचानक गवतगंजी जळून खाक झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता सदर आगीची घटना घडली. नुकतीच भातमळणी करून चार ट्रॅक्टर गवत होईल एवढी गवतगंजी शेतामध्ये घातली होती. शेतातील गवतगंजीवरून गेलेल्या थ्रीफेज विद्युत तारांचा अचानक स्पर्श होऊन ठिणगी गवतगंजीवर पडली अन् त्यांच्या डोळ्यासमोरच आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता गवतगंजी जळून खाक झाली. शिवारातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु काही उपयोग झाला नाही.
50 हजाराचा फटका
यावर्षी निसर्गाने दुष्काळी परिस्थिती निर्माण केल्यामुळे गवताचीही किंमत वाढली आहे. गवत जळून सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले. पुन्हा पिंजर विकत घ्यायचे म्हणजे 25 हजार मोजावे लागणार आहेत. यामुळे या गरीब शेतकऱ्यांला सुमारे 50 हजार रुपयांचा फटका बसला आहे. घटनेचा तलाठीकडून पंचनामा केला असून चौगुले यांना शासनाकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.









