कंग्राळ गल्ली पंच कमिटी-शेतकऱ्यांतर्फे पूजा
बेळगाव : कंग्राळ गल्लीच्यावतीने हनुमाननगर येथील गौळदेव धुपटेश्वर देवाला पावसासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. कंग्राळ गल्ली व गांधीनगर येथील पंच कमिटी व शेतकरी नागरिकांच्या उपस्थितीत पावसाची मागणी करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने नंदी पळवून त्यावर भाताचे गोळे मारण्यात आले. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही कंग्राळ गल्ली पंच कमिटीच्यावतीने धुपटेश्वराला पावसासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. शहरात मुबलक पाऊस होऊन पाण्याची चिंता मिटू दे, असे गाऱ्हाणे घालण्यात आले. शहर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील यांनी गाऱ्हाणे घातले. गाऱ्हाणे घातल्यानंतर काही वेळातच जोरदार पाऊस झाला. यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. प्रारंभी शहर देवस्थान कमिटीच्यावतीने महापौर शोभा सोमनाचे व उपमहापौर रेश्मा पाटील यांचे स्वागत करण्यात आले. माजी आमदार अनिल बेनके यांनी कंग्राळ गल्ली पंच कमिटीचे कौतुक करत शहरासाठी पाणी मागितले जात असल्याचे सांगितले. यावेळी शहर देवस्थान मंडळाचे सेक्रेटरी परशराम माळी, मालोजी अष्टेकर, विठ्ठल पाटील, बाबुराव कुट्रे, अशोक कंग्राळकर, शंकर बडवाण्णाचे, नगरसेवक शंकर पाटील यासह गांधीनगर व कंग्राळ गल्ली येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.









