विजापूर-चडचण घटनेतील आरोपींना लवकरच गजाआड करणार : अपघात घडताच कार सोडून चोरट्यांचे पलायन
वार्ताहर/विजापूर
चडचण, जि. विजापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियावर मंगळवारी सायंकाळी घातलेल्या दरोड्याच्या शोधासाठी आठ पथके नियुक्त करण्यात आली असून दरोडेखोर पंढरपूरच्या दिशेने फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूरजवळ दरोडेखोरांच्या कारला अपघात झाल्यानंतर कार तेथेच सोडून त्यांनी पलायन केले आहे. मंगळवार दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 ते 7 यावेळेत चडचण येथील पंढरपूर मुख्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये दरोडा पडला आहे. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने पिस्तूल व इतर शस्त्रांचा धाक दाखवत 20 किलो सोने व दीड कोटी रुपये रोख रक्कम पळविल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. केवळ चार महिन्यांत घडलेला हा दुसरा दरोडा आहे.
बुधवारी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड यांनी चडचणला भेट देऊन या घटनेसंबंधी माहिती घेतली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामनगौडा हट्टी आदींसह बहुतेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी चडचणमध्ये तळ ठोकला होता. 23 मे 2025 च्या सायंकाळी 7 ते 25 मे च्या सकाळी 11.30 यावेळेत मनगोळी, जि. विजापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेत मोठी चोरी झाली होती. या प्रकरणी हुबळी येथील विजयकुमार मिरियाल व चंद्रशेखर नरेल्ला या जोडगोळीसह त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. विजयकुमार हा ज्या बँकेत चोरी झाली, त्या बँकेचा माजी व्यवस्थापक आहे. कॅनरा बँकेच्या
लॉकरमधून चोरट्यांनी 53 कोटी 26 लाख रुपये किमतीचे 58 किलो 79 ग्रॅम सोन्याचे दागिने पळविले होते. तब्बल एक महिन्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यातील आजवरच्या या मोठ्या चोरीचा छडा लावला होता. संपूर्ण राज्यात विजापूर पोलिसांचे कौतुक झाले होते. केवळ चार महिन्यांत चडचण येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर दरोडा टाकण्यात आला आहे. मनगोळी व चडचणमधील घटनांत फरक असला तरी दोन्ही प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात लूट झाली आहे. चडचण येथील दरोड्यानंतर बँक ग्राहकांनी गर्दी केली होती. बँकेत सोने ठेवलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. केवळ चार महिन्यांत विजापूर जिल्ह्यात घडलेल्या दोन मोठ्या घटनांमुळे बँकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नियोजनबद्धपणे दरोड्याचा प्रयत्न
मंगळवारी सायंकाळपासूनच दरोडेखोरांपैकी एक जण बँकेत खाते उघडायचे आहे, असे सांगत तेथे तळ ठोकून होता. बँक बंद होताना त्याने अन्य दोघा जणांना बोलावून घेतले. दरोडेखोरांनी हिंदीतून ‘कॅश निकालो वरना जान से मार दूँगा’ असे धमकावत व्यवस्थापकावर पिस्तूल रोखले. नागरिकांनी गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने त्यांनी पळविले आहेत. कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून त्यांना एका खोलीत बांधून घालून तिघा जणांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. अकाऊंट उघडायचे आहे, असे सांगत आलेल्या 25 ते 30 वर्षीय दरोडेखोर व त्याच्या साथीदारांनी हे कृत्य केले आहे.
अपघातग्रस्त कारच्या माध्यमातून तपास…
यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. लवकरच दरोडेखोरांचा शोध घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कारमधून दरोडेखोर पंढरपूरच्या दिशेने पळाले आहेत. हुलजंतीजवळ कारला अपघात झाला. स्थानिक नागरिक व दरोडेखोर यांच्यात वादावादीची घटनाही घडली. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथून पलायन केले आहे. केए 24 डीएच 2456 क्रमांकाची कार यासाठी वापरण्यात आली आहे. तिची नंबरप्लेट खरी आहे की खोटी? याचीही पडताळणी करण्यात येत आहे. हुलजंतीजवळ आढळलेल्या कारमध्ये काही सोन्याचे दागिने सापडल्याचेही सांगण्यात आले.
-जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी










