कोल्हापूर / पूजा मराठे :
यकृतात, ह्रदयात, मेंदूत इतकेच नाही तर आईच्या दुधात आणि नाळेतही प्लास्टीकचे कण सापडले आहेत. तरीही प्लास्टीकचा वापर वाढतच असल्यामुळे कचऱ्यातही प्लास्टीकचे प्रमाण सर्वाधिक आहे. याची गंभीर दखल घेत ‘प्लास्टीक कचरामुक्त कोल्हापूर’ ग्रुपने शहरातील प्लास्टीकमुळे होणारे प्रदुषण कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलायचे ठरवले आहे. ग्रुपचे कार्यकर्ते त्यांच्या घरांमध्ये आसपासच्या परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करतात. हा कचरा महिन्यातील दोनवेळा प्लास्टीक पुर्नवापरासाठी देतात. आजतागायत ग्रुपतर्फे शहरातून गोळा केलेले हजारो किलो प्लास्टीक पुर्नवापरासाठी पाठवले आहे. ग्रुपमधील कार्यकर्ते काम सांभाळून प्लास्टीकपासून होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी कार्यरत आहेत.
- वीसहून अधिक शाळांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रम
या ग्रुपने प्लास्टीक वापर टाळण्यासाठी अतिशय निरागस गटावर लक्ष केंद्रीत केले आहे. तो गट म्हणजे विद्यार्थीदशेतील मुले. ग्रुपतर्फे शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्लास्टीकचे दुष्परिणाम सांगून प्लॅस्टीक वापर टाळण्यासाठी प्रबोधन करतात. सोबत या विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन वापरातील प्लास्टीक, घरातील व परिसरातील प्लास्टीक गोळा करुन ते एकत्र शाळेच्या आवारात जमा करण्यासाठीही सांगितले जाते. ग्रुपतर्फे 20 हून अधिक शाळांमध्ये हा प्रबोधनात्मक उपक्रम राबवला आहे.
लहान मुलांवर हे प्रबोधनात्मक संस्कार झाले, तर आज नाही पण भविष्यात कोल्हापूर नक्की प्लास्टीक कचरामुक्त होईल, ही आशा बाळगून कार्यकर्ते विविध उपक्रम राबवत असून पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी प्लास्टीक कचरामुक्त अभियान सुरु केले आहे.
- प्लास्टीक कस द्यायचं ?
तुमच्या घरगुती वापरातील प्लास्टीकच्या पिशव्या, वस्तु द्यायच्या असतील तर त्यामधील पिशव्या या स्वच्छ धुतलेल्या असाव्यात. (दुधाच्या किंवा तेलाच्या पिशव्या स्वच्छ धुवून वाळवलेल्या असाव्यात.) एका पोत्यामध्ये 15-20 दिवसांचे प्लॅस्टीक भरून ठेवून ते जमा करावे.
प्लास्टीकचा कचरा आमच्याकडे द्या !
आजपर्यत महिला भिशी, घरगुती समारंभ, सोसायटीमध्ये अशा विविध 30 ते 40 ठिकाणी प्लॅस्टीक कचऱ्यासंदर्भात प्रबोधन केले आहे. जुन्या साड्यांच्या कापडी पिशव्या बचत गटांकडून शिवून घेते आणि वाटप करते. या गटांमधील लोकांना सवय लागेपर्यंत स्वत: प्लॅस्टीक गोळा केले. त्यानंतर आता घरात प्लॅस्टीक कचरा आणून देतात. सध्या माझ्याकडे महिन्याला 10 पोती प्लॅस्टीक कचरा गोळा होतो. आपण रोजचा प्लॅस्टीक कचरा वेगळा केला तर रोजचा कचरा कमी प्रमाणात तयार होईल. प्लॅस्टीक कचरा हा 15 दिवस घरात साचून राहू शकतो. हा कचरा तुम्ही आम्हाला द्या, आम्ही पुर्नवापरासाठी देऊ.
सविता साळोखे, स्वयंसेवी कार्यकर्त्या

डिस्पोजेबल ग्लासमधून चहा घेऊ नका
शहरातील अनेक बाजार मंडई, चहा टपरी, महिला ग्रुप अशा विविध ठिकाणी जाऊन स्वखर्चातून स्टीलच्या लहान ग्लासचे वाटप करते. डीस्पोजेबलग्लासमधून चहा पिऊ नका, त्यातील मायक्रो प्लॅस्टीक पोटात जाऊन कॅन्सरसारखे भयानक आजार होऊ शकतात, असे प्रबोधनही करतात.
डॉ. विदुला स्वामी, निवृत्त प्राध्यापिका
- प्लॅस्टीक कचरा द्यायचा आहे, संपर्क साधा
सविता साळोखे– 9359018701 रंकाळा टॉवर, दुधाळी हरी मंदीर कोल्हापूर डॉ. अर्चना कुलकर्णी– 9767906200 आर.के. नगर.कोल्हापूर
प्रविण मगदूम– 9922926780 राजारामपुरी 8 वी गल्ली, कोल्हापूर
परितोष उरुकुडे– 9767906200 जरगनगर, पाचगाव, कोल्हापूर
मयूर गोवावाला– 9421102678 माळी कॉलनी, कोल्हापूर








