पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण
बेळगाव : महापालिकेतील फाईल गायब प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच तापले होते. फाईल गायब झाल्याबद्दल आरोप-प्रत्यारोपांसह पोलीस स्थानकात तक्रार देण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. त्यानंतर शुक्रवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांसमोर फाईल मिळाली असून ती महापालिका आयुक्तांकडे दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमके कोणते वळण घेणार, हे पाहावे लागणार आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करवाढीबाबत ठराव करण्यात आला होता. त्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव बेंगळूरच्या नगरपालिका संचालनालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र यावर तारखेचा उल्लेख चुकीचा झाला, असा आरोप करत सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्त अशोक दुडगुंटी यांना कोंडीत पकडले होते. तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्या फाईलवर महापौरांनीही सही केली आहे, त्याबाबतची झेरॉक्स प्रत आपल्याकडे आहे. मात्र, मूळ फाईल कोठे गेली? असा प्रश्न त्यांनी केला होता.
या प्रकरणानंतर तत्कालीन कौन्सिल सेक्रेटरी यांनी फाईल नेल्याचा आरोप करण्यात आला. तर महापौर शोभा सोमणाचे यांच्यावरही फाईल घेतली म्हणून आरोप करून मार्केट पोलीस स्थानकामध्ये तक्रार देण्यात आली. या प्रकरणानंतर आरोप-प्रत्यारोप झाले. बराच वाद निर्माण झाला. पोलिसांनीही महापौरांच्या घरावर नोटीस चिकटविली. यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले होते. एकूणच अधिकाऱ्यांनाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी गटाच्या नगरसेवकांनी जोरदार आवाज उठविला. महानगरपालिकेच्या या सभेला पालकमंत्री सतीश जारकीहोळी उपस्थित होते. त्यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. सत्ताधारी गटाने आयुक्तांना लक्ष्य बनविले तर विरोधी गटाने महापौरांना लक्ष्य बनविले होते. एकूणच हे प्रकरण आरोप-प्रत्यारोपांमुळे चांगलेच गाजले होते. सुवर्णविधानसौधमध्ये शुक्रवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांसमोर बोलताना फाईल सापडली असून ती फाईल महापालिका आयुक्तांकडे दिल्याचे सांगितले आहे. मात्र, फाईल गायब कोणी केली? तसेच आतापर्यंत कोठे होती? याबद्दल मात्र त्यांनी पत्रकारांसमोर स्पष्टीकरण दिले नाही. फाईल सापडल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले असून आता याला पुढे कोणते वळण लागणार, हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.









