शासकीय अनुदान पुन्हा सुरू करण्याची मागणी
बेळगाव : राज्यातील गोशाळांना दिले जाणारे अनुदान राज्य सरकारने थांबविले आहे. यामुळे गोशाळांमधील जनावरांना कसे सांभाळायचे? हा प्रश्न गोशाळा चालकांसमोर आहे. हिंदू धर्मात गायीला मातेप्रमाणे स्थान दिले जाते. परंतु, राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आज अनेक गोशाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे गोशाळांचे अनुदान पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी मुप्पीन काडसिद्धेश्वर मठ सेवा समितीच्यावतीने बुधवारी सुवर्णविधानसौध परिसरात आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारकडून पुण्यकोटी योजनेंतर्गत मिळणारे अनुदान बंद आहे. तसेच दत्तक योजनेतून सामाजिक कार्यकत्यर्किंडून गायींची सेवा होत होती. ती देखील आता बंद करण्यात आली आहे. अनुदान नसल्याने गोशाळा चालविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. राज्य सरकारकडून गायींच्या चाऱ्यासाठी 17 रुपये 50 पैसे अनुदान दिले जाते. हे अनुदान तुटपुंजे असून पूर्वीप्रमाणेच प्रत्येक गोशाळेला वर्षाला 2 लाख रुपयांचे अनुदान देण्याची मागणी सुतकट्टी शिवापूर येथील मुप्पीन काडसिद्धेश्वर महाराजांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने गोशाळांबाबत योग्य निर्णय न घेतल्यास येत्या काळात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी वीरभद्र स्वामी, गंगाधर स्वामी, माणिक्यचन्न ऋषवेंद्र स्वामी, आत्मानंद स्वामी, परमेश्वर स्वामी, बसवप्रसाद स्वामी यांसह बेळगाव परिसरातील विविध मठांचे प्रमुख सहभागी होते.
मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामीजींना आर्थिक मदत द्या
हिंदू धर्माचा प्रचार व प्रसार करणाऱ्या मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामींचा मोठा अपघात झाला. यामध्ये त्यांचे दोन सेवक मृत्युमुखी पडले. स्वामींवर बरेच महिने उपचार करण्यात आले असून ते सध्या धोक्याबाहेर आहेत. परंतु, राज्य सरकारकडून त्यांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासनाने त्यांच्या आरोग्यासाठी तसेच गोशाळेसाठी आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









