वृत्तसंस्था / मुंबई
येथे झालेल्या 31 व्या जीडी बिर्ला स्मृती मास्टर्स आंतरक्लब बॅडमिंटन स्पर्धेत गोरेगाव स्पोर्ट्स क्लबने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम फेरीत गोरेगाव क्लबने यजमान बॉम्बे जिमखाना क्लबचा 2-1 अशा फरकाने पराभव केला.
इलाईट चषक सांघिक आंतरक्लब बॅडमिंटन स्पर्धेत अपर्णा पोपट, मांगरीश पालेकर, मनोज नाचणेकर यांनी या स्पर्धेत दुहेरी मुकूट मिळविला. अंतिम फेरीच्या लढतीमध्ये गोरेगाव क्लबच्या संजीव महाजन आणि एस. भगवान यांनी दुहेरीच्या सामन्यात गौतम लाड आणि फैजल सिद्दकी यांचा 21-18, 14-21, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात बॉम्बे जिमखान्याच्या शैलेश डागा आणि अयाद बिलवाला यांनी दुहेरीच्या सामन्यात गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या लेरॉय डिसोजा आणि हेमंत डुग्गल यांचा 21-14, 21-18 असा पराभव करत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात राजेश भानुशाली आणि अभिषेक शर्मा यांनी अपर्णा पोपट व विमलदीप सिंग यांच्यावर 21-13, 21-19 अशी मात करत गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला जेतेपद मिळवून दिले. पुरुष एकेरीत मनोज नाचणेकरने चेतन भंडारकरचा 22-20, 21-19 असा पराभव करत एकेरीचे जेतेपद तर त्यानंतर नाचणेकरने राहुल भुवाद समवेत दुहेरीचे जेतेपद पटकाविले. 45 वर्षीय वयोगटातील मांगरीश पालेकर आणि विक्रांत पटवर्धन यांनी दुहेरीचे जेतेपद मिळविताना गौतम लाड आणि संदीप मोहन यांचा 21-18, 21-17 असा पराभव केला.









