11 वर्षांनी खटल्याचा निर्णय : माजी मंत्र्याने भोगला होता तुरुंगवास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हरियाणातील बहुचर्चित एअर होस्टेस गीतिका आत्महत्याप्रकरणी दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी आमदार गोपाळ कांडा यांची निर्दोष मुक्तता केली आहे. कांडा याप्रकरणी मुख्य आरोपी होती. कांडा हे हरियाणाचे गृह राज्यमंत्री राहिले आहेत. कांडा यांना या आरोपाप्रकरणी 18 महिने तुरुंगात रहावे लागले होते. 11 वर्षांनी या प्रकरणाशी संबंधित खटल्याचा निर्णय देण्यात आला आहे.
माझ्याविरोधात एकही पुरावा नव्हता. माझ्याविरोधात कट रचत हे प्रकरण उभे करण्यात आले होते. परंतु न्यायालयाने यातून माझी मुक्तता केली असल्याचे कांडा यांनी म्हटले आहे. कांडा यांच्यासोबत त्यांच्या एमडीएलआर कंपनीच्या व्यवस्थापिका अरुणा चड्ढा यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सध्या याप्रकरणी बोलण्याच्या मनस्थितीत मी नाही. या प्रकरणी पुढील काळात कोणते पाऊल उचलावे यावर विचार करणार असल्याचे गीतिकाचे बंधू अंकित यांनी म्हटले आहे. कांडा यांचे राजकीय भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होते. कांडा हे दोषी ठरले असते तर त्यांना विधानसभा सदस्यत्व गमवावे लागले असते.
गीतिका ही आमदार कांडा यांच्या एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. वयाच्या 23 व्या वर्षी तिने 5 ऑगस्ट 2012 रोजी दिल्लीतील स्वत:च्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली होती. गीतिकाच्या कुटुंबीयांनी गोपाळ कांडा यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.
गोपाळ कांडा हे पूर्वी सिरसा येथे रेडिओ दुरुस्तीचे काम करायचे. त्यानंतर त्यांनी फुटवेअरचे दुकान सुरू केले होते. यात यश मिळाल्यावर त्यांनी चप्पल निर्मितीचा प्रकल्प सुरू केला होता. काही काळानंतर कांडा यांनी राजकारणात पाऊल ठेवत रियल इस्टेट व्यवसायात भाग घेतला होता. 2008 साली कांडा यांनी स्वत:च्या वडिलांच्या नावावर गुरुग्राममध्ये एमडीएलआर एअरलाइन्स सुरू केली होती. परंतु वाद निर्माण झाल्यावर त्यांनी ही कंपनी बंद केली होती.