गुजरातमध्ये आम आदमी पक्ष सक्रीय
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आम आदमी पक्षाने गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाने गोपाळ इतालिया यांना उमेदवारी दिली आहे. जूनागढ जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघ डिसेंबर 2023 पासून रिक्त आहे. भयानी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. यापूर्वी 12 मार्च रोजी गुजरात उच्च न्यायालयाने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत विसावदर मतदारसंघातील तत्कालीन आप आमदार भूपेंद्र भयानी यांच्या विजयाला आव्हान देणारी भाजप नेते हर्षद रिबडिया यांची याचिका निकाली काढली होती. यामुळे या मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता.
यापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील 6 रिक्त जागांपैकी 5 ठिकाणी पोटनिवडणूक करविली होती. परंतु विसावदर मतदारसंघाचा मुद्दा न्यायालयासमोर प्रलंबित असल्याने त्यावेळी येथे पोटनिवडणूक होऊ शकली नव्हती. आता न्यायायलाने याचिका निकाली काढल्याने निवडणूक आयोगाकडून लवकरच येथील पोटनिवडणुकीची घोषणा होणार असल्याचे मानले जात आहे. तर भाजपकडून या मतदारसंघात भयानी यांनाच उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.









