गोपाळ बदने व प्रशांत बनकर यांची पोलीस कोठडी वाढवली
फलटण : येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणातील अटकेत असणाऱ्या संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने व प्रशांत बनकर यास पोलिसांनी गुरुवारी पुन्हा येथील न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दि. १ नोव्हेंबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फलटण उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या बीड जिल्ह्यातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने व प्रशांत बनकर हे संशयित आरोपी असून ते अटकेत आहेत. न्यायालयाने त्यांना दिलेल्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा फलटण येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने त्यांची दि. १ नोव्हेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढविली आहे. दरम्यान, दुपारच्या सुमारास गोपाळ बदने व प्रशांत बनकर या दोघांनाही फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात बंदोबस्तात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी ज्या ठिकाणी बदने हा अधिकारी म्हणून वावरत होता त्याच ठिकाणी आरोपी म्हणून त्याला आणण्यात आले होते. त्यामुळे येथील उपस्थितांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.








