कोल्हापूर :
मित्राचा खून करून चार महिने पसार झालेल्या सराईत गुंडास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास यश आले. गणेश रतन नवले (वय 42, रा. नागोबावाडी, पेठ वडगाव, ता. हातकणंगले) असे त्याचे नांव आहे. गुरुवारी (दि. 29) सकाळी नागोबावाडी येथील त्याच्या घरात छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. 24 जानेवारी 2025 रोजी नागोबावाडी येथील ओढ्याजवळ संतोष नायकवडी (वय 35, रा. नागोबावाडी) याचा खून करुन गणेश पसार झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ वडगाव येथील शाहू मैदान परिसरात संतोष व गणेश 24 जानेवारी 2025 रोजी दोघे थांबले होते. त्यावेळी नवले याने संतोषला घरी जाण्यास सांगितले. मात्र संतोषचा पाठलाग करून नागोबावाडी ओढ्याजवळ त्याला मारहाण केली. यामध्ये संतोष मृत पावला. त्याचा मृतदेह ओढ्यात ढकलून नवले पसार झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी गुह्याचा छडा लावला होता. मात्र, गुन्हा घडल्यापासून आरोपी पसार झाल्याने तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. नागदेववाडी येथील घरात नवले आल्याची माहिती अंमलदार संदीप पाटील आणि शिवानंद मठपती यांना मिळाली. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने छापा टाकून नवले याला अटक केली. त्याने गुह्याची कबुली दिली असून, पुढील तपासासाठी त्याचा ताबा पेठ वडगाव पोलिसांकडे देण्यात आला.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार वसंत पिंगळे, प्रकाश पाटील, वैभव पाटील, अरविंद पाटील, सोमराज पाटील, कृष्णात पिंगळे, अमित सर्जे यांनी ही कारवाई केली.
- गणेश नवलेवर मोक्काचा प्रस्ताव
गणेश नवले याच्यावर चोरी, दरोडा, घरफोडीचे पेठ वडगाव, कोडोली, हातकणंगले, जयसिंगपूर, इचलकरंजी, शाहूपुरी, शिरोली एमआयडीसी, कराड, कुरळप आणि आष्टा पोलीस ठाण्यात 33 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाईसाठी पोलिसांनी प्रस्ताव सादर केला आहे.
- मिळेल ते काम करुन पोट भरले
गणेश नवले याने संतोषचा खून केल्यानंतर तो पेठवडगांव येथून आष्टा, सांगलीमार्गे सोलापूर येथे गेला. तीन ते चार महिने त्याने सोलापूर येथे वास्तव्य केले. मिळेल ते काम करून आणि भीक मागून तो स्वत:चे पोट भरत होता. तो अविवाहित असून, घरी आई आणि बहीण असते.








