22 एप्रिल हा पृथ्वी दिन म्हणून जगभरात साजरा करण्याची प्रथा आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीला सध्या वाढत्या तापमानाचा आणि पर्यावरण हानीचा सर्वात मोठा धोका भेडसावत आहे. या संकटापासून पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी अनेक संस्था त्यांच्या त्यांच्या मार्गांनी आणि आणि पद्धतींनी कार्यरत आहेत.
गुगलनेही आपल्या ‘डुडल’द्वारे पर्यावरण संरक्षणाचा आणि हवामान बदलापासून आपण आपले संरक्षण कसे करु शकतो याची उपयुक्त माहिती असणारा संदेश प्रसारित केला आहे. आपण सर्वसामान्य लोक कशाप्रकारे पर्यावरणाच संरक्षण करुन पृथ्वीचे तापमान वाढविणाऱया वायूंचे उत्सर्जन कमीतकमी ठेवण्यासाठी प्रयत्न करु शकतो, याचे काही उपाय डुडलवर प्रसारित करण्यात आले आहेत. यात, ड्रायरचा उपयोग टाळणे, वनस्पती आधारित आहार (शाकाहार) जास्तीत जास्त प्रमाणात घेणे, वाहनाचा उपयोग करण्यापेक्षा शक्य तितने चालणे किंवा सायकलचा उपयोग करणे, वीजेचा उपयोग कमीत कमी करणे, साधी जीवनशैली अंगिकारणे अशा उपायांचा समावेश आहे. मानव प्रजाती आणि इतर सर्व जीवसृष्टी यांच्या अस्तित्वासाठी हे उपाय करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
वातावरण प्रमाणाबाहेर तापल्यास ध्रूवांवरचे बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे समुद्रानजीकची शहरेही पाण्याखाली जाण्याची शक्यता येत्या 50 ते 100 वर्षांमध्ये निर्माण होणार आहे. सध्याही वातावरण प्रमाणाबाहेर तापल्याने पावसाचे चक्र बिघडले आहे. हे संकट प्रामुख्याने मानवनिर्मित असल्याने मानवालाच ते स्वप्रयत्नांनी दूर करावे लागणार आहे.









