पिक्सेल 8 या मॉडेलसह होणार प्रारंभ: मेड इन इंडिया उपकरणांसह 2024 मध्ये होणार उपलब्ध
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आगामी काळात आता जगातील दिग्गज टेक कंपनी गुगल आपल्या फोनची निर्मिती भारतामध्ये करणार आहे. गुगल पिक्सल 8 हा फोन पुढील वर्षी सादर केला जाणार असून यासंबंधीची घोषणा गुरुवारी गुगल फॉर इंडिया या कार्यक्रमात करण्यात आली. यावेळी गुगलचे डिव्हाइसेस प्रमुख रिक ऑस्टरलोह व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. यामध्ये देशी उपकरणे वापरण्यात आली असून सदरचा स्मार्टफोन 2024 पासून बाजारात उपलब्ध होणार आहे.
कंपनीची भारतात भागीदारी
‘पिक्सेल उपकरणांची स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन वाढवण्याच्या दिशेने ही सुरुवातीची पायरी असेल, असे ऑस्टरलोह म्हणाले. विशेष म्हणजे मेक इन इंडियासाठी गुगलच्या वचनबद्धतेतील हे एक मोठे पाऊल आहे. गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये भारतात पिक्सेल फोनच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली.
अॅपल आयफोनचे उत्पादन भारतातच
अॅपल ही प्रसिद्ध आयफोन कंपनी आधीपासून आयफोन भारतात बनवत आहे. आता गुगलही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत उपादन आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक केंद्र बनायचे आहे. 2025-26 पर्यंत 300 अब्ज डॉलर किमतीची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने तयार करण्याची योजना आखली आहे.









