उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भल्या सकाळी घेतलेल्या शपथविधीला तीन-साडेतीन वर्षे उलटून गेली असली, तरी त्याचे कवित्व अद्यापही संपले नसल्याचेच दिसून येते. पहाटेचा शपथविधी ही दस्तुरखुद्द पवार यांचीच योजना असल्याचे फडणवीस यांनी सांगणे नि सत्तालालसा उघड करण्यासाठीच आपण गुगली टाकून त्यांची विकेट काढल्याचे उत्तर पवार यांनी देणे, ही निव्वळ राजकीय टोलेबाजीच म्हणता येईल. त्यामुळे यातून मनोरंजनाशिवाय काही हाती येईल, अशी अपेक्षा बाळगणे भाबडेपणाचे ठरावे. शह-काटशह, राजकीय डावपेच, मार्चेबांधणी, कूटनीती हा राजकारणाचा भागच मानला जातो. महाराष्ट्रातही अशा पद्धतीचे राजकारण वेळोवेळी पहायला मिळाले असले, तरी आपला सुसंस्कृतपणा राज्याने कालपरवापर्यंत तरी टिकवून ठेवला होता. तथापि, मागच्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण कमालीचे बदलल्याचे दिसते. साम, दाम, दंड, भेद अशा विविध आयुधांचा यथेच्छ वापर, पाताळयंत्रीपणा, कपटनीती, कुटील कारस्थानांचा हैदोस, लोकप्रतिनिधींची पळवापळवी, फोडाफोडी अशा सगळ्या छटा आता येथे सर्रास पहायला मिळतात. पहाटेचा शपथविधी हा त्यातलाच एक आविष्कार म्हणावा लागेल. 2019 पर्यंतचे महाराष्ट्राचे राजकारण तुलनेत सरळसोट ठरावे. 2019 नंतर येथील राजकारणाने जे नाट्यामय वळण घेतले, त्याला तोड नाही. 2014 ला युती तुटल्यानंतर सेना व भाजपा स्वतंत्र लढले. मात्र, सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांना एकत्र यावे लागले. तथापि, पाच वर्षांच्या सत्ताकाळात सेनेला कायम दुय्यम भूमिकेत वावरावे लागल्याने सेनेत एकप्रकारचा असंतोष होताच. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी तेव्हा आपल्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची तलवार उपसल्याचे बऱ्याच जणांच्या स्मरणात असेल. या उपरान्तही 2019 मध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवितात, एकमेकांच्या जागा पाडतात, या अंतर्गत साठमारीत भाजपा अधिक यशस्वी होतो नि सरतेशेवटी त्यांच्यात दुरावा निर्माण होतो, येथपर्यंतचा राजकीय ड्रामा फार काही धक्कादायक ठरू नये. किंबहुना, त्यानंतर जे झाले, तेथून येथील राजकारणाचा जो स्तर ढासळत गेला, तो आजतागायत सुस्थिर होऊ शकलेला नाही. अचानक फडणवीस आणि अजित पवार एकत्र येतात काय, भल्या पहाटे राज्यपाल महोदय उठून त्यांना शपथ देतात काय नि भाजपा व राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होते काय, हे सगळेच अचंबित करणारे. आधी दादांचे बंड म्हणून त्याकडे पाहिले गेले, त्यानंतर पवारांची खेळी म्हणून याचा उल्लेख झाला. सेनेतील अभूतपूर्व बंड व शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्ता स्थापन झाल्यानंतर या शपथविधीचे कवित्व थांबेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यावर अधूनमधून ऊहापोह होतच राहिला. मध्यंतरीही फडणवीस यांनी यावर केलेले भाष्य चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा उपमुख्यमंत्र्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीने राजकीय अवकाश व्यापल्याचे पहायला मिळते. भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्णन हे सर्रास नॅशनल करप्शन पार्टी म्हणून केले जाते. अशा पक्षासोबत सेना कशी जाते, असा सवालही या पक्षाची मंडळी उपस्थित करीत असतात. परंतु, पहाटेच्या शपथविधीचा विषय आला, की पक्षाची अडचण होते. शिंदेंना ओढून सेनेला शह देता आला, ही वस्तुस्थिती असली, तरी आगामी लढाई ही जनतेच्या न्यायालयात आहे, हे भाजपा ओळखून आहे. त्यामुळेच आम्ही फक्त साधेभोळेपणाने पाऊले टाकत होतो, योजना पवार यांचीच होती, असे सांगत स्वत: नामानिराळे राहण्याचा त्यांचा डाव असावा. भाजपावाल्यांचा हेतू अगदी स्वच्छ होता, त्यांचे अंत:करण शुद्ध होते, असे एकवेळ मान्य केले, तरी मग पवारांच्या योजनेप्रमाणे हा पक्ष चालतो काय, असाही सवाल उपन्न होऊ शकतो. उद्धव सेना पवारांच्या सल्ल्याने चालते, असा आरोप अलीकडे सातत्याने होत असतो. मग योजनेच्या अनुषंगाने हेच तत्त्व भाजपालाही लागू होत नाही काय? काही असो हे सगळे न समजण्याइतपत जनता आता दुधखुळी राहिलेली नाही. पवार यांचे राजकारण कसे ‘डबलगेमी’य आहे, हे सांगण्याचाही फडणवीस प्रयत्न करतात. हे अधोरेखित करण्यात फडणवीस काही अंशी यशस्वी झाले, असे आपण म्हणू शकतो. मात्र, यात नवीन ते काय? पवार बोलतात एक, करतात भलतेच, त्यांची डबल ढोलकी, हे येथील जनता पुरेपूर जाणून आहे. स्वत: पवार यांनीच होय मी गुगुली टाकली नि विकेट घेतली, कुणी विकेट देत असेल, तर घ्यायची नाही का, असा सवाल करीत एका धूर्त कर्णधाराची प्रतिमा लोकमनावर ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. अलगद जाळे विणावे नि प्रतिस्पर्ध्याला त्यात अडकवावे, हा पवार यांच्या राजकारणाचा विशेष होय. शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन हे जगातील सार्वकालीक फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जातात. एका षटकातील सर्वच्या सर्व सहा चेंडू वेगळे नि चक्रावून सोडणारे टाकण्याची क्षमता या दोन गोलंदाजांमध्ये होती. पवारांच्या खेळ्यांची तुलना करायची झाली, तर म्हणूनच या दोघांशी करावी लागेल. भल्याभल्यांना आजवर पवारांच्या खेळ्यांचा अंदाज आलेला नाही. म्हणूनच शपथविधीच्या मुद्द्यावर भाजपावाले जितका काथ्याकूट करत राहतील, तितके ते त्यात गुरफटत राहतील नि भाजपा सत्तेशिवाय राहू शकत नाही, हे सांगणे पवारांना सोपे जाईल. आगामी निवडणुका तोंडावर आहेत. पवार आणि फडणवीस यांच्यातील जुगलबंदीला त्यातूनच अधिक धार चढलेली दिसते. राजकीय कुरघोड्या, खेळ्यांमध्ये हे दोन्ही नेते एकापेक्षा एक आहेत. सत्ता कुणाची असो. मागची चार ते पाच दशके महाराष्ट्राच्या राजकारणावर पवारांचाच प्रभाव दिसून आला आहे. भविष्यात पवारांची जागा देवेंद्र फडणवीस, हे घेऊ शकतात, असे मानायला निश्चित जागा आहे. अनेकदा फडणवीसांची चाणक्यनीती अनाकलनीय असते. ते काय पेरतील नि त्यातून काय उगवेल, हे काहीच सांगता येत नाही. त्यामुळे पुढचा निवडणुकीचा सामना अधिक रोमांचकारी असेल.








