लेमडावर चालणारी कृत्रिम बुद्धिमत्ता सेवा कार्यरत ः स्पर्धा रंगणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वरती सहा वर्ष काम केल्यानंतर आता गुगलने आपला चॅटबॉट ‘बार्ड’ बाजारात आणला आहे. गुगलचा चॅटबॉट मायक्रोसॉफ्टच्या चॅटजीपीटीशी स्पर्धा करणार असून त्याला भविष्यात टक्कर देण्याच्या दृष्टीने ही तयारी सुरु असल्याचे गुगलचे संकेत दिसून येत आहेत.
एका ब्लॉगपोस्टमध्ये गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी बार्ड म्हणजे काय आणि त्याची काही मूलभूत कार्यक्षमता काय राहणार आहे, याचे स्पष्टीकरणही यावेळी दिले आहे. बार्ड ही प्रायोगिक संभाषणात्मक एआय सेवा आहे. यामध्ये संभाषणासाठी कंपनीच्या भाषा मॉडेल डायलॉग ऍप्लिकेशनचा वापर करावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याचा वापर काही आठवडय़ांमध्येच होईल सक्षम
कंपनीने सांगितले की, नव्या प्रणालीचा परीक्षणासह वापर सुरु करत आहोत. त्यामुळे आगामी काही आठवडय़ांमध्ये लोक ही नवीन सुविधा वापरण्यास सक्षम असतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. गुगल सुरुवातीला लेमडाच्या लाइट मॉडेल आवृत्तीसह बार्ड सादर करत आहे. ज्यासाठी संगणकीय ज्ञान आवश्यक आहे.
गुगलने चॅटजीपीटीच्या रचनेप्रमाणे बार्डची रचना केली आहे.
चॅट जीपीटी म्हणजे काय?
ओपनएआय या आर्टिफिशयल इंटेलिजन्सवर काम करणाऱया कंपनीने एक नवीन चॅटबॉट तयार केला आहे. चॅटबॉट म्हणजे मशिनशी बोलल्यासारखे आहे. यामध्ये वापरकर्ते त्याला काहीही विचारले असता त्याचे उत्तर खुसखुशीतपणे अगदी कमी वेळेत मानवाप्रमाणे तपशीलवार लिहून देईल. सध्याला याचाच बोलबाला दिसत आहे.









