मोबाईलसाठी प्रति महिना 900 रुपये, वेब वापरकर्त्यांसाठी 650 रुपये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ट्विटरने गुरुवारी भारतात ब्ल्यू सेवा सुरू केली. अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल वापरकर्त्यांना ब्ल्यू सबक्रिप्शनसाठी दरमहा 900 रुपये द्यावे लागणार आहेत. वेब वापरकर्त्यांना 650 रुपयांमध्ये ब्ल्यू सबक्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये वेब वापरकर्त्याने वार्षिक सबक्रिप्शन घेतल्यास त्यांना सवलत देण्यात येणार आहे. यामध्ये 7,800 ऐवजी 6,800 रुपये द्यावे लागतील.
ब्ल्यू सबक्रिप्शनमध्ये काय मिळेल?
ब्ल्यू सबक्रिप्शनमध्ये, वापरकर्त्यांना ट्विट संपादित करणे, एचडी दर्जाचे व्हिडिओ, रीडर मोड आणि निळी टिक मिळेल. याशिवाय तुम्हाला रिप्लाय आणि सर्चमध्ये प्राधान्य मिळेल. सामान्य वापरकर्त्यांना 50टक्के जाहिराती दाखवल्या जातील आणि नवीन वैशिष्टय़ांना देखील प्राधान्य मिळेल.
सर्व जुनी निळी टिक काढून टाकणार
एलॉन मस्क यांनी ट्विट केले की, ‘आम्ही काही महिन्यांत सर्व ब्ल्यू टिक काढून टाकू. ज्या पद्धतीने हे निळे टिक देण्यात आले ते चुकीचे होते.’ मस्कच्या ताब्यात येण्यापूर्वी, निळा मार्क फक्त राजकारणी, सेलिब्रिटी, पत्रकार आणि इतर सार्वजनिक व्यक्तींसाठी राखीव होता.
अमेरिका, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह काही देशांमध्ये ब्ल्यू सबक्रिप्शन सेवा सुरू केली आहे.









