भारतात 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक रोखली : कंपनीकडून सेफ्टी चार्टर सादर
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सायबर फ्रॉडपासून लोकांना वाचविण्यासाठी गुगलने 2023 मध्ये डिजिकवच लाँच केले होते. याच क्रमात आता गूगलने सेफ्टी चार्टर सादर करत लोकांना कशाप्रकारे ऑनलाइन स्कॅमपासून वाचविले हे सांगितले आहे. गुगलचे सेफ्टी चार्टर हे ऑनलाइन फ्रॉड, सायबर सुरक्षा आणि रिस्पॉन्सिबल एआय डेव्हलपमेंटसंबंधी आहे. डिजिकवच अंतर्गत गुगलने 6 कोटी हायरिस्क अॅप इन्स्टॉलेशन प्रयत्नांना ब्लॉक केले आहे. याचबरोबर गुगल प्लेने 4.1 कोटी स्कॅम ट्रान्जॅक्शन अलर्ट्स जारी केले आहेत.
2024 मध्ये गुगल प्लेने 13 हजार कोटी रुपयांची फसवणूक रोखण्यास मदत केली आहे. जीमेल आणि गुगल मेसेजने शेकडो लाख स्पॅम ईमेल्स आणि स्कॅम टेक्स्टला दर महिन्याला ब्लॉक केले आहे. या स्कॅम्स आणि स्पॅम्सला रोखण्यासाठी गुगलने ऑन-डिव्हाइस एआयचा वापर केला आहे.
विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी आम्हाला इंटरनेट आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला विश्वसनीय करावे लागेल आणि ते कायम ठेवावे लागेल. आमची एआय सिस्टीम सातत्याने प्रगत होत आहे, यामुळे नवे थ्रेट्स आणि स्कॅम्स रोखता येत आहेत. तसेच पूर्वी कधीच न झालेल्या पॅटर्न्सची ओळख पटत असल्याचे गुगल इंडियाच्या कंट्री मॅनेजर प्रीति लोबाना यांनी म्हटले आहे.
गुगल सायबर सुरक्षा क्षमता वाढविण्यासाठी 2 कोटी डॉलर्सची गुंतवणूक गुगल डॉट ओआरजीद्वारे द एशिया फौंडेशनमध्ये करणार आहे. हे फौंडेशन नव्या सायबर क्लिनिक एशिया पॅसिफिकममध्ये गुंतवणूक करेल. याचबरोबर आयआयटी मद्राससोबत गुगल पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफीवर काम करणार आहे.
डिजिकवच
डिजिटल आणि कवच या दोन शब्दांद्वारे डिजिकवच हा शब्द तयार झाला आहे. ऑनलाइन फसवणूक विरोधात हे एक सुरक्षा कवच प्रदान करते. ही एक अर्ली थ्रेट डिटेक्शन आणि वॉर्निंग सिस्टीम आहे. ही सिस्टीम गुगल युजर्सना भारतात सायबर गुन्ह्यांपासून वाचविते. ही सिस्टीम संभाव्य फसवणुकीची माहिती वापरकर्त्यांना देत त्यांना याचा शिकार होण्यापासून वाचविते.









