खेड :
एका टेम्पोतून छुप्प्या पद्धतीने गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच येथील पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 60 हजार रुपये किंमतीचा गुटखा व 4 लाखांचा टेम्पो असा 4 लाख 60 हजार 984 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अविनाश दादासाहेब पारेकर (21 रा. बेवनूर-सांगली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी रेल्वे स्थानकानजीक कारवाई केली. गुटखा वाहतुकीचे सांगली ‘कनेक्शन’ समोर आले आहे. या प्रकरणात रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अविनाश पारेकर हा टेम्पोतून (एम.एच. 10 टी.डी. 6678) गुटख्याची वाहतूक करत होता. गुटखा वाहतुकीसाठी संशयिताने पोत्यात सर्वप्रथम लाकडाचा भुसा भरून त्यामध्ये गुटखा लपवून ठेवला होता. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर व पथकाने सापळा रचला. पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी, तुषार झेंड, अभिजित चव्हाण, पोलीस हवालदार ठाकूर यांचा समावेश होता. टेम्पो रेल्वे स्थानकानजीक आल्यावर पोलिसांनी झडती घेतली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयिताला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर लाकडाचा भुसा भरलेल्या पोत्यांमध्ये गुटखा असल्याची कबुली दिली. पोलिसांनी पोत्यातील गुटखा व टेम्पो हस्तगत केला.
गुटखा सांगली येथून आणल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिली. यामुळे गुटखा वाहतुकीचे सांगली ‘कनेक्शन’ पोलीस तपासात उघड झाले आहे. महामार्गावरील लोटे परिसरातील व्यावसायिकांनाही त्याने गुटख्याचा पुरवठा केल्याचा पोलिसांना संशय आहे. गुटखा वाहतूक प्रकरणात आणखी काहींचा सहभाग असल्याच्या शक्यतेने पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले करीत आहेत.








