नायकोल गावावर शोककळा : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, वीर जवान अमर रहे…च्या घोषणा
वार्ताहर /गुंजी
सोमवारी दिल्ली येथे निधन झालेले जवान यशवंत सहदेव गावडा यांना मंगळवारी सायंकाळी हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मंगळवारी दुपारी गावडा यांचे पार्थिव दिल्लीहून नायकोल या मूळ गावी आणण्यात आले. सकाळपासूनच नायकोलमध्ये लोकांनी अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गावात पार्थिवाचे आगमन होताच काही काळ लोकांनी घरासमोर त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये विविध मान्यवर आणि सैनिकांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी खानापूर तालुक्याच्या आमदार अंजलीताई निंबाळकर, भाजपा नेते विठ्ठल हलगेकर, प्रमोद कोचेरी, अरविंद पाटील, बाबुराव देसाई, पंडित ओगले आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. सैनिकांच्या सलामीनंतर यशवंत गावडा यांच्या चिमुकल्या सुपुत्राने त्यांना अग्नी दिला. यावेळी खानापूर तालुक्यातील शासकीय अधिकारी, शेंदोळी ग्राम पंचायत पीडिओ व कर्मचारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, निवृत्त सैनिक संघटनेचे पदाधिकारी व गुंजी पंचक्रोशीतील निवृत्त जवान व नागरिक, गुंजी सेक्शन फॉरेस्टर राजू पवार व स्टाफ विविध संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी अमर रहे… च्या घोषणांनी परिसर दणाणला. जवान यशवंत गावडे यांचे पार्थिव गावात येताच उपस्थितांकडून अमर रहे.. अमर रहे.. वीर जवान अमर रहे.. ज्या घोषणांनी परिसर दणाणला.
अन् अश्रू अनावर झाले
जवान यशवंत गावडा यांचे पार्थिव घरासमोर येताच त्यांच्या पत्नीने हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितांना अश्रू आवरणे कठीण झाले. त्याचबरोबर स्मशानभूमीतही त्यांचा चिमुकला मुलगा शौर्य याने अजाणतेपणे आपल्या पित्यास अग्नि देताना पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून गेले.









