यंदा गोव्यात पडला 135 इंच पाऊस : हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा
पणजी : गोव्यासह देशभरातून मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याने काल गुऊवारी केली आहे. मान्सूनकाळ संपल्यानंतरच्या 19 दिवसांमध्ये राज्यात 5.40 इंच (137.2 मिमी) पावसाची ऩोंद झालेली आहे. यावर्षी 1 जून ते 30 सप्टेंबर या मान्सूनच्या काळात राज्यात सुमारे 135 इंच पाऊस पडला आहे. यंदा देशभरासह गोव्यात मान्सूनचे उशिरा आगमन झाले. त्यानंतर काही दिवस गायब झाल्यानंतर संपूर्ण राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली होती. या काळात शेवटचे काही दिवस पाऊस पुन्हा गायब झाला होता. पण मान्सूनकाळ संपल्यानंतरही पावसाने हजेरी लावली.
काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले. डिचोली, सत्तरी भागांत वादळी पाऊस पडल्याने झाडे, वीजखांब कोसळले. इतर काही भागांतही पावसामुळे स्थानिकांना नुकसानीस सामोरे जावे लागले. राज्यातून मान्सून परतण्याच्या वाटेवर होता. त्यामुळेच राज्यात सकाळच्या सत्रात धुके तसेच दुपारी उकाडा जाणवत होता. काल गुऊवारी मान्सून देशातून पूर्णपणे परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमध्ये मान्सून काळ संपल्यानंतरही राज्यात पावसाचे प्रमाण कायम असल्याचे दिसून आलेले आहे. यावर्षीही पुढील काळात पाऊस कायम राहिल्यास त्याचा सर्वात जास्त फटका पणजीला बसणार आहे. कारण स्मार्ट सिटीअंतर्गत पणजीतील काही भागांत पुन्हा कामे सुरू करण्यात आलेली आहेत. अशा परिस्थितीत पुन्हा पावसाने हजेरी लावल्यास स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांवरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे.









