संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत हवाई दलाचा ‘योद्धा’ निवृत्त
वृत्तसंस्था/ चंदीगड
भारतीय हवाई दलाचे वर्षानुवर्षे एक बलस्थान असलेले मिग-21 लढाऊ विमान शुक्रवारी निवृत्त झाले. चंदीगड येथे एका समारंभात ही घोषणा करण्यात आली. 62 वर्षे भारताच्या हवाई सीमांचे रक्षण करणाऱ्या मिग-21 लढाऊ विमानाला शुक्रवारी अंतिम सलामी देण्यात आली. याप्रसंगी हवाई दल प्रमुखांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना ‘फॉर्म 700 लॉगबुक’ रजिस्टर सादर केले. सदर रजिस्टर बुक लढाऊ विमानाच्या सेवेचा अंतिम शिक्का मानला जातो. त्यानंतर तो हवाई दलाच्या वारशाचा एक भाग बनतो. मिग-21 च्या निरोपानंतर आता लढाऊ विमानांची कमतरता भरून काढण्यासाठी एलसीए तेजस एमके1, एमके2 आणि राफेल लढाऊ विमानांचा एक नवीन स्क्वॉड्रन हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चंदीगडमध्ये आयोजित मुख्य निरोप समारंभात मिग-21 ला वॉटर कॅनन सलामी देण्यात आली. मिग ताफ्याच्या अंतिम निवृत्तीनिमित्त हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना फॉर्म-700 (विमानाची लॉगबुक) सुपूर्द केली. तसेच मिग-21 च्या सन्मानार्थ एक विशेष ‘डे कव्हर’ देखील जारी करण्यात आले. या समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीडीएस जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, माजी हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी, बी. एस. धनोआ, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, लष्करप्रमुख, नौदलप्रमुख यांच्यासह शेकडो माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी हवाई दल प्रमुखांनी स्वत: मिग-21 उडवून निरोप देताना सदर विमान अजूनही लढाईसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.
फॉर्म 700 मध्ये विमानाचा तांत्रिक लॉग, लढाऊ विमानाच्या देखभालीचा संपूर्ण रेकॉर्ड असतो. त्यात कोणत्याही तांत्रिक समस्या, यंत्रसामग्री किंवा घटकांमधील बिघाड आणि विमानाच्या देखभालीचा संपूर्ण रेकॉर्ड असतो. उ•ाणादरम्यान तो विमानासोबत ठेवला जातो. फॉर्म 700 चे हस्तांतरण विमानाच्या निवृत्तीचे प्रतीक मानले जाते. आता हे रेकॉर्ड संरक्षणमंत्र्यांच्या स्वाधीन केल्यामुळे भारतीय हवाई दलाने मिग-21 च्या ताफ्याला अंतिम निरोप दिला आहे.
हवाई दल प्रमुखांनी केले मिग-21 चे अंतिम उड्डाण
मिग-21 हे जवळजवळ 62 वर्षांपासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ ताफ्याचा आधारस्तंभ आहे. शुक्रवारी चंदीगड हवाई दलाच्या तळावर या सोव्हिएत काळातील लढाऊ विमानाला अंतिम निरोप देण्यात आला. 23 व्या पँथर्स स्क्वॉड्रनच्या शेवटच्या मिग-21 विमानाचे फॉर्म 700 लॉगबुक संरक्षणमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आले. तत्पूर्वी, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी बादल-3 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्क्वॉड्रनचे अंतिम उड्डाण केले.

आमच्यासाठी कुटुंबातील सदस्यासारखे : राजनाथ सिंह
निरोपपर आयोजित कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. मिग-21 च्या अद्वितीय वैशिष्ट्यांचे वर्णन करताना संरक्षणमंत्र्यांनी ते भारत आणि रशियामधील मजबूत संबंधांचे प्रतीक असल्याचे वर्णन केले. मिग-21 आपल्या राष्ट्राच्या आठवणी आणि भावनांमध्ये खोलवर रुजलेले आहे. 1963 मध्ये पहिल्यांदा आमच्या सेवेत आल्यापासून ते आजपर्यंतचा 60 वर्षांहून अधिक काळचा प्रवास अतुलनीय आहे. आपल्या सर्वांसाठी, ते केवळ एक लढाऊ विमान नाही, तर एक कुटुंबातील सदस्य असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. मिग-21 ने आमचा आत्मविश्वास वाढवला आहे. देशाची रणनीती मजबूत केली आहे आणि जागतिक स्तरावर आमची ओळख निर्माण करण्यास मदत केली आहे. 63 वर्षांच्या दीर्घ प्रवासात या लढाऊ विमानाने प्रत्येक आव्हानाचा सामना केला आहे आणि प्रत्येक वेळी आपली क्षमता सिद्ध केली असल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी अभिमानाने सांगितले.
प्रत्येक आव्हानाचा सामना
मिग-21 ने दशकांपासून आमच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या पंखांवर पार पाडली आहे. भारतातील प्रत्येक गावातील प्रत्येक मुलाला मिग-21 चे पराक्रम माहित आहेत. या लढाऊ विमानाने प्रत्येक आव्हानाचा सामना करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. आज मी प्रथम भारतीय हवाई दलाच्या शूर सैनिकांना सलाम करतो. भारताची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही स्वातंत्र्यानंतर दाखवलेले शौर्य आणि पराक्रम हे सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या शौर्याच्या या प्रवासात मिग-21 ने महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे मला वाटते. आज, जेव्हा आपण मिग-21 ला त्याच्या ऑपरेशनल प्रवासातून निरोप देत आहोत, तेव्हा मला वाटते की आपण एक असा अध्याय संपवत आहोत जो केवळ भारतीय हवाई दलाच्या इतिहासातच नव्हे तर आपल्या संपूर्ण लष्करी विमान वाहतुकीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असेही ते पुढे म्हणाले.









