चिनी संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन ः शांततेसाठी प्रयत्न सुरू
वृत्तसंस्था / सिंगापूर
चीन आणि भारत शेजारी असून परस्परांमध्ये चांगले संबंध राखणे दोन्ही देशांच्या हितांची पूर्तता करणारे ठरणार आहे. याचमुळे दोन्ही देश प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांततेसाठी मिळून काम करत आहेत असे प्रतिपादन चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंगे यांनी केले आहे. सिंगापूरमधील शांगरी-ला चर्चासत्राला संबोधित करताना वेई यांनी दक्षिण चीन समुद्रासह क्षेत्रीय वाद सोडविण्यासाठी शांततापूर्ण पद्धती स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.
भारतीयांसोबत आम्ही कमांडर स्तरावर 15 फेऱयांमध्ये चर्चा केली आहे. या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही मिळून काम करत आहोत असे वेई यांनी म्हटले आहे. वेई हे अमेरिककन थिंक टँक ब्रुकिंग्स इन्स्टीटय़ूशनमध्ये द इंडिया प्रोजेक्टच्या संचालिका डॉ. तन्वी मदान यांच्या एका प्रश्नाचे उत्तर देत होते. दोन वर्षांपूर्वी पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अनेक ठिकाणी जैसे थे स्थिती बदलण्यासाठी एकतर्फी पाऊल का उचलले अशी विचारणा मदान यांनी केली होती.
भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान पूर्व लडाखमध्ये 5 मे 2020 पासून तणावाची स्थिती आहे. तेथील पँगोंग सरोवर क्षेत्रात दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. चीन सीमावर्ती भागांमध्ये पूल तसेच रस्ते आणि नागरी इमारतींची निर्मिती करत आहे. लडाखमधील तणाव संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत सैन्य चर्चेच्या 15 फेऱया पार पडल्या आहेत. चर्चेनंतर दोन्ही देशांनी मागील वर्षी पँगोंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण काठ तसेच गोगरा क्षेत्रातून स्वतःचे सैन्य मागे घेतले हेते.
चीनला धोका समजणे ऐतिहासिक चूक ठरणार
चीनकडे कुठल्याही धोक्याच्या स्वरुपात पाहणे आणि शत्रू मानण्याचा हट्ट एक ऐतिहासिक आणि धोरणात्मक चूक ठरणार असल्याचे उद्गार वेई यांनी काढले आहेत. चीन-अमेरिका संबंध हे जगाच्या हितांची पूर्तता करत असल्याचे आमचे मानणे आहे. दोन्ही देशांमधील सहकार्य जागतिक शांतता तसेच विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. संघर्षामुळे कुणाचाच लाभ होणार नाही. अमेरिकेने चीनच्या अंतर्गत विषयामंध्ये नाक खुपसू नये. तसेच चीनच्या हितांना नुकसान पोहोचविणेही बंद करावे. जोपर्यंत अमेरिका हे करत नाही तोवर दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकत नसल्याचा दावा वेई यांनी केला आहे.









