धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. पणसुले व केळावडे नाले प्रवाहीत. पाण्याचा साठा करणे सद्यस्थितीत शक्य नाही
डिचोली : अंजुणे धरणाची खालावत चाललेली पाणी पातळी व पावसाने मारलेली दडी यामुळे चिंतातूर बनलेल्या जनतेसाठी पावसाने खुशखबर दिली आहे. अंजुणे धरण क्षेत्रात तसेच चोर्ला घाटमाथ्यावर गुरूवारपासून दमदार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे धरण भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून धरणात येणारे पणसुले व केळावडे हे दोन महत्वाचे नाले प्रवाहीत झाले आहेत. त्यामुळे कोरडा पडलेल्या जलाशयाला जिवंतपणा निर्माण झाला आहे. उत्तर गोव्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या या धरणातील पाण्याची पातळी हि बरीच खालावल्याने या धरणातून पाण्याचा पुरवठा होणारा पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु धरणाच्या अंतिम गेटमधून पाण्याचा पुरवठा सुरूच होता. व या गेटखाली पाणी गेल्यास पंप बसवून पाणी वाळवंटी नदीत सोडण्याचा पर्याय ठेवण्यात आला होता. त्यानुसार पंपची व्यवस्था करून कनेक्शनेही देण्यात आले होते. व संध्याकाळी पाण्याचे पंपींग करून ते नदीत सोडण्याची प्रक्रीयाही हाती घेण्यात आली होती.
या पर्यायावर काम सुरू असतानाच गुरूवारीच धरण क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाची बरसात काल शुक्रवारीही सकाळीपासूनच चालूच राहिल्याने संध्याकाळी धरणात येणारे नाले पाण्याने प्रवाहीत झाले होते. या जलाशयात असलेल्या अंजुणे, केळावडे, पणसुले व गुळ्ळे या चाळ गावांमधून चार नाले या धरणात थेट येतात. त्यापैकी कालच्या दमदार पावसात केळावडे व पणसुले गावातून येणारे नाले प्रवाहीत होऊन पाणी जलाशयात येऊ लागले होते. जलाशयात पाणी येत असल्याचे दृष्य पाहून धरणावरील सहाय्यक अभियंता दिलीप गावकर व कर्मच्रायांच्या मुखावर आनंदी हास्य उमलल्याचे पहायला मिळाले. जुन संपायला आला तरी आटत चाललेला अंजुणे जलाशय भरू लागला आहे, हि उत्तर गोव्यातील लोकांसाठी आनंदाची व समाधानाची बाब आहे. येत्या काळात पावसाने जोर धरल्यावर या धरणातील पाण्याची पातळी समाधानकाररित्या वाढू लागणार आहे.









