स्वयंपाकाचा गॅस 200 रुपये स्वस्त : उज्ज्वला योजना लाभार्थींनाही मिळणार लाभ
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रक्षाबंधनाचा सण नजीक आलेला असताना आणि गणेशोत्सवाच्या आधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आनंदित करणारा निर्णय घेतला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसाधारणपणे सध्या 1,100 रुपयांना मिळणारा सिलिंडर आता 900 रुपयांना उपलब्ध होणार आहे. ही सवलत सर्व गॅस ग्राहकांना मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी या निर्णयाला मान्यता देण्यात आली. हा निर्णय देशभरातील महिलांसाठी शुभवार्ता ठरेल असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींनाही याचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या लाभार्थींना आधीपासून 200 रुपयांचे अनुदान मिळत होते. ते आता 400 रुपयांचे होणार आहे. त्यामुळे त्यांना एक सिलिंडर 700 रुपयांना मिळेल.
सणासुदीच्या निमित्ताने
येत्या काही दिवसांमध्ये रक्षाबंधन आणि ओनम हे सण येत आहेत. ओनम हा सण प्रामुख्याने केरळमध्ये साजरा केला जातो. तर रक्षाबंधन हा सण देशभरात साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव आहे. त्यानंतर दसरा आणि दिवाळी अशा सणासुदीच्या काळाचा प्रारंभ होतो. या काळात लोकांना महागाईचा फटका बसू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दोन महिन्यांपासून आढावा
गॅसदरात कपात करण्यावर गेल्या दोन महिन्यांपासून विचार केला जात होता. अनुदानाच्या प्रमाणावर तज्ञांशी आणि अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात आली. योग्य प्रकारे आढावा घेऊन नंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या निर्णयाचा लाभ देशभरातील सर्व गॅस कनेक्शन धारकांना मिळणार आहे.
75 लाख कनेक्शन्स देणार
येत्या काही काळात देशात गरिबांना आणखी 75 लाख गॅस कनेक्शन्स विनामूल्य देण्यात येणार आहेत. उज्ज्वला योजनेचे सध्या 9 कोटी 60 लाखांहून अधिक लाभार्थी आहेत. त्यांना या निर्णयामुळे विशेष समाधान लाभणार आहे. सर्वसामान्यांना वाजवी दरात स्वयंपाकासाठी इंधन उपलब्ध करुन देणे हे केंद्र सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर केले गेले.
7,500 कोटींचा भार पडणार
या निर्णयामुळे देशाच्या तिजोरीवर 7 हजार 500 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तथापि, तो सहन करण्याची आर्थिक क्षमता आहे. सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देणे हे कर्तव्य असून केंद्र सरकार यासंबंधात संवेदनशील आहे. आगामी काळातही सर्वसामान्यांना समाधान वाटेल अशा योजना आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, असे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकांचाही संबंध
येत्या काही महिन्यांमध्ये तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. विरोधकांनी महागाईच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. या निवडणुकांपाठोपाठ एप्रिल आणि मे मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा संबंध राजकारणाशीही जोडला जाण्याची शक्यता आहे.
प्रत्येक भगिनीला समाधान वाटेल
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे माझ्या प्रत्येक देशवासीय भगिनीला समाधान वाटेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. गॅसदरकपातीचा निर्णय घोषित केल्यानंतर त्यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निर्णयासंबंधी आनंद व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रथमच गॅसदरात कपात करण्यात आली आहे.
समाधानाची भावना
ड केंद्र सरकारच्या गॅसदरकपातीच्या निर्णयाचे जनसामान्यांकडून स्वागत
ड सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आगामी काळातही योजना आणणार
ड सणासुदीच्या काळात महागाईपासून दिलासा देण्यासाठी घेतला निर्णय
ड उज्ज्वला योजना लाभार्थींनांही लाभ, 400 रुपयांचे अनुदान दिले जाणार