Kolhapur News : 24 तासांची ड्युटी, बंदोबस्ताचा ताण तणाव, रजा, सुट्यांची शाश्वती नाही आणि कुटूंबाला द्यायला वेळही नाही अशा स्थितीत तपासाची जबाबदारी पार पाडत कर्तव्यावर तत्पर असणाऱ्या जिल्ह्यातील पोलिसांसाठी खूषखबर आहे. आता त्यांच्या मुलांसाठी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने लवकरच निवासी वसतीगृहाची उभारणी केली जाणार आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करुन पोलीस महासंचालकांकडे विशेष प्रस्ताव पाठविला होता. त्याला नुकतीच मंजूरी मिळाल्याने वसतीगृह उभारणीचा मार्ग सुकर झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी, आंबा, गगनबावडा, राधानगरी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, पाटगांव हे दुर्गम भाग आहेत. या ठिकाणी कर्तव्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी नेमले जातात. तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस कर्मचारी पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय गावामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी होते. मात्र पोलीस पाल्यांना उच्च माध्यमिक व तेथून पुढील उच्च शिक्षणासाठी कोल्हापूर शहरात येण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी आपल्या पाल्याला नवीन ठिकाणी शिक्षणासाठी पाठविताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनात एक प्रकारे भिती असते. याचसोबत कोल्हापूर सारख्या शहराच्या ठिकाणी राहण्याची व जेवणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. यामुळे काही पोलीस कर्मचारी आपल्या मुलांना व मुलींना शहराकडे पाठविण्यापासून दचकतात. पोलीस कर्मचाऱ्यांची मुलांच्या भविष्याची तळमळ आणि त्यासाठी होणारी अडचण लक्षात घेवून पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी वसतीगृह उभारणीचा प्रस्ताव तयार करुन हा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविला होता. यास नुकतीच मंजूरी मिळाली आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पोलीस मुख्यालयातच हे वसतीगृह उभारण्यात येणार असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची चिंताही आता दूर होणार आहे.
असे असेल 60 बेडचे वसतीगृह
पोलीस मुख्यालयासमोरील गार्डन शेजारी असणाऱ्या रिकाम्या जागेत 60 बेडचे वसतीगृह उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 मुले व 30 मुलींसाठी उभारण्याचे नियोजन आहे. याला मंजूरीही देण्यात आली आहे. इतर वसतीगृहांप्रमाणेच या ठिकाणी वेळेचे बंधन असणार आहे. लक्ष ठेवण्यासाठी रेक्टर ठेवण्यात येणार आहेत. मात्र या वसतीगृहासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. सोबतच चांगल्या प्रतिचा नाष्टा, पौष्टीक जेवणही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पोलीस महासंचालकांकडून मंजूरी मिळाल्यानंतर तात्काळ या वसतीगृहाची जागा निश्चीत करण्यात आली आहे. याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच याची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लायब्ररी, मैदानाचीही सोय
या वसतीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी व मैदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पोलीस उद्यानाच्या शेजारील इमारतीमध्ये पोलीस दलाची लायब्ररी आहे. तसेच अलंकार हॉलच्या पिछाडीस असणारे मैदानही पोलीस पाल्यांना सरावासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. स्पर्धा परिक्षा, तसेच पोलीस भरती, अग्नीवीर भरतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
राज्यात दुसरा उपक्रम
कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणारा वसतीगृहाचा हा उपक्रम राज्यात दुसरा उपक्रम आहे. पुणे शहर येथे अशाच प्रकारे पुणे पोलिसांच्या वतीने अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला आहे. याचपाठोपाठ कोल्हापूरातही अशाच प्रकारे कोल्हापूरातही पोलीसांच्या मुलांसाठी वसतीगृह उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना या वसतीगृहामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. यानंतर काही जागा शिल्लक राहिल्या तर इतर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही प्रवेश देण्यात येणार आहे.
कोल्हापूर जिह्याच्या कानाकोपऱ्यातून पोलीस कर्मचारी पोलीस दलात आहेत. त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी शहरात यावे लागते. मात्र कर्मचाऱ्यांना मुलांच्या शिक्षणासोबतच राहणे, जेवणे याचा खर्च हाताबाहेर जातो. यामुळे अशा कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळावा म्हणून हे वसतीगृह उभारण्यात येणार आहे. पोलीस दलातील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांना याचा नक्कीच आधार वाटेल.
पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








