महागाई भत्त्यात 2.25 टक्के वाढ
बेंगळूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा खूशखबर मिळाली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2.25 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधीचे आदेशपत्रक बुधवारी जारी करण्यात आले आहे. सदर भत्तावाढ 1 ऑगस्ट 2024 पासून लागू होईल, याप्रमाणे जारी करण्यात आली आहे. अलिकडेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढविला आहे. सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींनुसार सुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतनानुसार महागाई भत्तावाढ जारी होत आहे. त्यामुळे सध्या असणाऱ्या मूळ वेतनातील 8.50 टक्के असणारा भत्ता 10.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. यंदाच्या 1 ऑगस्टपासून भत्तावाढ दिला जाणार आहे.
याचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच निवृत्तीवेतन घेणारे, कौटुंबिक पेन्शन घेणारे, अनुदानित शिक्षण संस्थांमधील कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी यांनाही मिळणार आहे. युजीसी/एआयसीटीई/ आयसीएआर वेतनश्रेणीतील राज्यातील निवृत्त कर्मचारी, सरकारच्या आणि जिल्हा पंचायतींमधील पूर्णवेळ कर्मचारी, तात्पुरत्या वेतनश्रेणीतील पूर्णवेळ कर्मचारी आणि सरकारकडून वेतनानुदान घेणाऱ्या शिक्षण संस्था, विद्यापीठांमधील तात्पुरत्या वेतनश्रेणीतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांनाही भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे. महागाई भत्तावाढीच्या निर्णयाबद्दल राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांनी सरकारचे आभार मानले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट अपलोड केली आहे.









