रेल्वे तिकीट आरक्षण चार्ट 24 तास आधी तयार होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रवाशांच्या सोयींमध्ये मोठी सुधारणा करताना भारतीय रेल्वेने एक नवीन पुढाकार घेतला आहे. आतापासून रेल्वे आरक्षण चार्ट 24 तास आधी तयार केला जाणार आहे. याद्वारे प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही याची माहिती 24 तास आधी मिळेल. पूर्वी ही माहिती फक्त 4 तास आधी उपलब्ध होती. या बदलामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे चांगले नियोजन करण्यास मदत होईल. तसेच ते पर्यायी व्यवस्था देखील करू शकतील. 6 जूनपासून बिकानेर विभागात या नवीन प्रणालीची चाचणी सुरू झाली असून लवकरच ती देशाच्या इतर भागातही लागू केली जाईल.
ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे मंत्रालय आता एक नवीन नियम आणण्याचा विचार करत आहे. नव्या नियमामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये सीट मिळवण्याबाबत होणारा त्रास कमी होईल. नवीन नियमानुसार रेल्वे ट्रेन सुरू होण्याच्या 24 तास आधी चार्ट जारी करण्याची योजना आखत आहे. साहजिकच प्रवाशांना 24 तास आधीच त्यांच्या सीटची स्थिती कळणार आहे. यामुळे दूरवरून येणाऱ्या प्रवाशांना खूप समस्या निर्माण होतात. त्यांचे तिकीट कन्फर्म आहे की नाही हे त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत कळत नव्हते. मात्र, आता ही माहिती एक दिवस अगोदरच समजणार असल्याने प्रवाशांची ‘धाकधूक’ कमी होणार आहे.
बिकानेर विभागात प्रायोगिक अंमलबजावणी
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही योजना राजस्थानच्या बिकानेर विभागात 6 जूनपासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत कोणतीही समस्या आलेली नाही. ‘आम्ही आणखी काही आठवडे नव्या नियमानुसार प्रायोगिक चाचणी सुरूच ठेवणार आहोत. त्यानंतर आम्हाला त्यात काही समस्या आहे का नाही ते कळेल. जर काही समस्या असेल तर ती कशी सोडवायची यावरही विचार केला जाईल’, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दूरवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीस्कर
रेल्वेने जारी केलेल्या चार्टमध्ये कोणत्या प्रवाशाला कोणती सीट मिळाली आहे याची माहिती असते. रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही नवीन प्रणाली प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्याप्रकारे करण्यास मदत करेल. उदाहरणार्थ, 100 किमी किंवा त्याहून अधिक अंतरावरून येणाऱ्या प्रवाशांना चांगली माहिती आणि स्टेशनवर पोहोचण्यासाठी वेळ मिळेल. यामुळे शेवटच्या क्षणी येणाऱ्या समस्या कमी होतील, असा दावा केला जात आहे.









