10 दिवस भरपूर झोपा अन् पैसे मिळवा
आळशी लोक नेहमीच कमीतकमी शारीरिक मेहनत करावी लागेल अशा कामाच्या शोधात असतात. एका ऑफरमुळे आळशी लोकांची ही अपेक्षा पूर्ण होणार आहे, कारण या लोकांना केवळ 10 दिवसांपर्यंत झोपण्याचे काम करावे लागणार असून याकरता त्यांना लाखो रुपयांची कमाई प्राप्त होणार आहे. या कामासाठी साडे चार लाखांहून अधिक रुपये मिळणार आहे. ही ऑफर युरोपीय अंतराळ संस्थेने दिली आहे. एका खास अध्ययनासाठी वॉटरबेडवर 10 दिवसांसाठी पडून राहतील अशा स्वयंसेवकांची भरती अंतराळ संस्था करत आहे.
खास प्रकारचा प्रयोग
विवाल्डी तीन नावाच्या या अनोख्या प्रयोगाला टोउलोउस युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या मेडेस स्पेस क्लीनिकमध्ये साकारण्यात येणार आहे. याचा उद्देश शरीरावर अंतराळ उ•ाणांचा प्रभाव जाणून घेणे आहे. प्रयोगादरम्यान 10 स्वयंसेवक वॉटरप्रूफ फॅब्रिकने झाकलेल्या बाथटबसारख्या कंटेनर्समध्ये राहतील, ज्यामुळे ते कोरडे परंतु पाण्यात बुडालेले राहणार आहेत.
प्रयोगाचे स्वरुप
स्वयंसेवकांचे डोके अन् हात पाण्यावर राहतील यामुळे त्यांना अंतराळवीरांना अंतराळस्थानकात येणाऱ्या अनुभवाची जाणीव होणार आहे. अशास्थितीत एखाद्या स्वयंसेवकाला बाथरुम ब्रेकला जायचे असेल तर त्याला एका ट्रॉलीत शिफ्ट करण्यात येईल, परंतु ब्रेकदरम्यान त्याची स्थिती कंटेनरच्या आतील स्थितीप्रमाणेच असेल. तर खाताना स्वयंसेवक फ्लोटिंग बोर्ड आणि उशीचा वापर करू शकतील. हा प्रयोग मानवी शरीरावर भारहीनतेचा कोणता प्रभाव पडतो हे जाणण्यासाठी केला जात आहे. प्रयोग एकूण 20 लोकांवर केला जाईल, परंतु सध्या यात कुठल्याही महिलेला सामील करण्यात आलेले नाही. हा प्रयोग 10 दिवसांसाठी असेल. परंतु याकरता स्वयंसेवकांना 21 दिवसांपर्यंत केंद्रात रहावे लागेल. पहिले 5 दिवस पडताळणी केली जाणार आहे, यानंतर पुढील 10 दिवस ते वॉटरबेडमध्ये असतील. तर अखेरचे 6 दिवस अन्य तपासणी केली जाणार आहे.









