निसर्गात जी शक्ती आणि ताकद आहे ती कशातच नाही. कालच एक आनंदवार्ता आली आहे आणि अवघी धरती आनंदली आहे. यंदा मान्सून सरासरी एवढा व चांगला बरसणार. बस या एका वार्तेने बळीराजाच नव्हे तर बाजारही आनंदला आहे. नोटा कितीही छापता येतात पण ज्वारी, गहू, तांदूळ पिकावा लागतो, पिकवावा लागतो. माणूस पैसा खातो पण त्याला नोटा खाऊन जगता येत नाही. त्याला जगण्यासाठी भाजी भाकरी आणि पाणी लागते आणि हे सारे मिळावे यासाठी पर्जन्य कृपा महत्त्वाची असते. भारतासारख्या काही देशांवर जूनमध्ये मोसमी पाऊस बरसतो. त्यामुळे भारतात पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे ऋतुचक्र सुरु राहते आणि शेतीचे खरीप आणि रब्बी असे दोन भाग पडतात. ओघानेच सर्वांच्या नजरा पावसाकडे, पावसाच्या अंदाजाकडे आणि खरीप हंगामाकडे लागलेल्या असतात. अलीकडे धरणे, तलाव, शेततळी बोअरवेल अशा सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे शेतीला बारमाही पाणी उपलब्ध होते पण या सुधारणांचा स्त्राsत पाऊसच असल्याने सर्व जीवन पावसावर अवलंबून असते. अजूनही कितीतरी जमीन कोरडवाहू आणि नापेर आहे. पावसाचा अंदाज व्यक्त करणारे विविध गोष्टींचा अभ्यास करतात, पक्षांनी घरटी किती उंचीवर बांधली इथपासून समुद्रातील तापमान, काही झाडांना आलेला मोहोर, अल निनो वगैरे स्थिती, मुंग्या, पक्षी, प्राणी यांच्या हालचाली या सर्वांचा अंदाज घेत पर्जन्य अंदाज व्यक्त करणारी मॉडेल तयार झाली आहेत. मानवाने जे उपग्रह अवकाशात पाठवलेत त्यांचाही याकामी उपयोग होत असतो. ओघानेच हे एक शास्त्र म्हणून विकसित झाले आहे व त्यावर विश्वास ठेवून नियोजन केले जाते. इंडियन ओशन डायपोल म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान. सकारात्मक असते म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते. पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे. या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो. सर्व गोष्टी पाहता भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सूनच्या काळात भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामानाचा हा अंदाज संपूर्ण मोसमासाठीचा आणि संपूर्ण देशासाठीचा असून पुढच्या काही आठवड्यांतील निरीक्षणांनी त्यात आणखी अचूकता येईल. याचा अर्थ असा, की हा दीर्घकालीन अंदाज केवळ एकूण किती पाऊस पडेल आणि कुठे जास्त पावसाची शक्यता आहे, याचं चित्र दर्शवतो. पण त्या पावसाचं वितरण कसं असेल, पावसाळी दिवसांची संख्या काय असेल, हे स्पष्ट होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. तसंच यंदा मान्सूनचं आगमन कधी अपेक्षित आहे, याविषयीचा अंदाज हवामान विभाग मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्याची शक्यता आहे. तर मे महिन्याच्या अखेरीस मोसमासाठीचं भाकित जाहीर केलं जाईल. ओघानेच सुरवात चांगली झाली आहे. आपल्याकडे कडक उन्हाळा, आंबा पिक आणि बहावा वगैरे झाडांचे फुलणे यावरुन शेतकरी अंदाज बांधतात आणि खरीप हंगामाची तयारी करतात. कधी काळी आपण अन्नधान्य आयात करत होतो पण आता आपल्याकडे बफर स्टॉक असतो. करोना काळात 80 कोटी लोकसंख्येला भारताने मोफत धान्य पुरवले होते ही बळीराजाची शक्ती आहे. हरितक्रांती नंतर भारताने शेतीत जी प्रगती केली ती वाखाणण्याजोगी आहे. नवे संकरीत वाण, पिक पद्धती आणि पाण्याचा परिणामकारक वापर यामुळे शेतीत सुधारणा होते आहे. नवनवीन औजारे आणि मिश्र पिके, सेंद्रिय शेती या सर्वाचा फायदा वाढीव लोकसंख्येला होतो आहे. शेतात जोंधळ्याचा एक दाणा पेरला तर चार महिन्यांत त्याचे मापटेभर दाणे होतात ही किमया इतरत्र नाही. तथापि शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाचा दर ठरवण्याचा हक्क नाही. ओघानेच बळीराजा कायम कर्जात राहतो. जय किसान आणि बळीराजाचे उत्पन्न तिप्पट करणार या केवळ घोषणा राहतात आणि शेतकरी आत्महत्या हा विषय गंभीर बनतो. मान्सूनचा अंदाज आला आणि चांगला पाऊस अशी शक्यता दिसली तरी सर्वत्र आनंदी आनंद दिसतो. बाजारात अन्नधान्य स्वस्ताई होते. शेअरबाजार उंचावतो आणि ट्रंप वगैरे कुणी काहीही कारवाया करो, भारतीय शेतकरी डगमगत नाही. शेतीला चांगल्या पावसा इतकीच चांगले बियाणे, आवश्यक खत आणि किटकनाशके यांची गरज असते. महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी हा विषय प्रलंबित आहे. हंगामापूर्वी त्याला सावकाराच्या दारात जावे लागणार नाही आणि बि-बियाणे उच्च प्रतिचे मिळेल अशी सरकारने काळजी घेतली पाहिजे. शेतीसाठी एआय तंत्रज्ञान निर्माण झाले आहे. ते शेतकऱ्यांना बांधावर उपलब्ध होणेसाठी काही काळ जावा लागेल. दरम्यान सरकारने हे तंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. शेतीत एकरी उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एका एकरात 120 टन ऊस पिकतो व शेजारी एकरी 20 टनही पिकत नाही, हा विरोधाभास संपला पाहिजे. चांगला पाऊस बरसणार ही वार्ताच आनंददायी आहे. या वार्तेने अवघे शिवार आनंदले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता मेघराज कधी शिवारात सांडतो आणि मातीचा कण कण फुलून खरीप हंगाम यशस्वी करतो हे बघायचे.
Previous Articleयजमानपद शर्यतीमध्ये भारताला कडवा प्रतिकार
Next Article न्यायमूर्ती गवई होणार 52 वे सरन्यायाधीश
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








