माजी मंत्री मिकी पाशेको यांची चर्चिलवर जोरदार टीका
पाशेको म्हणाले…
- ‘त्या’ साडेतीन कोटी जातात कुठे?
- चर्चिल स्वत:चाच फायदा पाहतात
- वारा येईल तसे सूप धरणारे चर्चिल
- कुटुंबियांनाच उमेदवारी वाटणारा नेता
- फ्रान्सिस सार्दिन अपयशी खासदार
- … तर काँग्रेसने आपणास बोलवावे
पणजी : आगामी लोकसभा निवडणुकीत आपण दक्षिण गोव्यातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांचे कट्टर राजकीय वैरी असलेले मिकी पाशेको यांनी केली. चर्चिल आलेमाव यांच्याकडे आता कोणताही जोडधंदा राहिलेला नाही. त्यामुळे फुटबॉलच्या नावाने सरकारकडून त्यांच्या क्लबसाठी मिळणाऱ्या रकमेसाठीच ते सरकारची भलावण करीत असल्याची जोरदार टीका करून चर्चिलचे राजकारण हे गेल्या 5 वर्षांपूर्वीच संपुष्टात आल्याचे पाशेको म्हणाले. दैनिक तरुण भारतशी बोलताना मिकी पाशेको यांनी चर्चिल आलेमाव यांच्यावर चौफेर टीका केली. चर्चिल केवळ स्वत:च्या फायद्याचे पाहतात. त्यांना जनतेचे काहीही पडलेले नाही. दिगंबर कामत यांच्या सरकारमध्ये 5 वर्षे ते ज्या खात्याचे मंत्री होते त्यातून त्यांचे आयुष्याचे कल्याण झाले. प्रचंड संपत्ती त्यांच्याजवळ आहे. आता जनतेने त्यांना मागील निवडणुकीत घरी बसविले व निवृत्त केलेले आहे.
साडेतीन कोटी नेमक्या जातात कुठे?
चर्चिल यांचे उत्पन्न 2017 च्या निवडणुकीनंतर बुडालेले हेते. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी नॅशनल लिग मध्ये असलेल्या फुटबॉल क्लबना सरकारतर्फे आर्थिक मदत जाहीर केली त्यातून दरवर्षी चर्चिल आलेमव यांच्या फुटबॉल क्लबला साडेतीन कोटी रुपये मदत मिळते, ती नेमकी कुठे जाते हे समजत नाही, असे मिकी म्हणाले.
वारा येईल तसे सूप धरणारे चर्चिल
सरकारकडून जोपर्यंत त्यांच्या क्लबला मानधन मिळतेय तोपर्यंत चर्चिल या सरकारची भलावण करणार असून हे सरकार सत्तेवर असेपर्यंत चर्चिलना भीती नाही. हे सरकार जाऊन दुसरे कोणाचे सरकार येऊ द्या. चर्चिल आलेमाव हे त्या सरकारची भलावण करण्यास पुढाकार घेतील. वारा येईल तसे सूप धरणारे स्वार्थी नेते म्हणजेच चर्चिल आलेमाव असे मिकी म्हणाले.
कुटुंबियांनाच उमेदवारी वाटणारा नेता
वास्तविक चर्चिल आलेमाव व त्यांच्या आलेमाव कुटंबाला 2012 च्या निवडणुकीत जनतेने घरी पाठवले. यानंतर देखील आलेमाव आपल्या मुलाला एका मतदारसंघात, स्वत: दुसऱ्या मतदारसंघात व मुलीला तिसऱ्या मतदारसंघात उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. आलेमाव कुटुंबियांपैकी पुढील निवडणुकीत एकटाही विजयी होणार नाही असे मिकी पाशेको म्हणाले. आपल्या कुटुंबियांनाच उमेदवारी वाटणारा हा नेता किती वेडेपणा करीत आहे? असा सवाल पाशेको यांनी केला. चर्चिल आलेमाव यांनी 2014 मध्ये निवडणूक लढविली होती. 21 मतदारसंघातून त्याने केवळ 12 हजार मते मिळविली होती. आता तर जनतेने त्यांना पूर्णत: झिडकारून टाकलेले आहे. त्यामुळे शहाणपण असेल तर चर्चिल आलेमाव यांनी निवडणूक लढवू नये, असे मिकी पाशेको म्हणाले. चर्चिल आलेमाव यांच्या स्वार्थी राजकारणाचा मिकी पाशेको यांनी खरपूस समाचार घेतला.
होय ! आगामी लोकसभा निवडणूक लढविणार
माजी मंत्री मिकी पाशेको यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती दिली. आपण अनेक वर्षे मंत्री होतो. विविध महामंडळेदेखील सांभाळली आहेत. आपले व्यवहार नेहमीच स्वच्छ असायचे. कोणीही आपल्या निर्णयावर कधी आक्षेप घेतला नाही वा भ्रष्टाचाराचे कधी आरोप देखील झाले नाहीत. आपली राजकारणात स्वच्छ प्रतिमा आहे. आपल्या एवढी स्वच्छ प्रतिमा अन्य कोणत्या राजकीय नेत्याची आहे काय? असा सवाल त्यांनी केला. पत्रादेवी ते काणकोणपर्यंत आपण काम केलेय. आपल्या राजकीय व्यवहारांची कधी कोणाला चौकशी करण्याची देखील गरज पडलेली नाही, असे मिकी म्हणाले.
… तर काँग्रेसने आपल्याला बोलवावे
आपल्याला सारा गोवा ओळखतोय. मागील विधानसभा निवडणुकीत आपण बाणावलीमध्ये काँग्रेसचे भरपूर काम केले. पण दिगंबर कामत आणि दोन नेत्यांनी अचानक आपली उमेदवारी रद्द करायला लावली. कारण अल्पसंख्याकांची मते फुटतील, असे पक्ष श्रेष्ठींना कळविले. असे आरोप करणारे आज नेमके कुठे आहेत ? हे सर्वजण काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपमध्ये गेले. आपल्याला त्यामुळे नाईलाजाने काँग्रेस पक्ष सोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागली होती. मात्र काँग्रेसला जर दक्षिण गोव्यात लोकसभेत विजय प्राप्त करून घ्यावयाचा असेल तर आपल्याला बोलवावे. आपण अवश्य काँग्रेसमध्ये जाईन व लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करून देईल.
फ्रान्सिस सार्दिन अपयशी खासदार
सध्याचे जे दक्षिण गोव्याचे खासदार आहेत त्यांचे वय झालेले आहे. गेल्या 5 वर्षात गोव्याचा आवाज लोकसभेत पोहोचलेलाच नाही. त्यामुळे अशा नेत्याला पुन्हा का निवडून द्यावे ? अनेक महत्त्वाचे विषय हाताळण्यात सार्दिन अपयशी ठरले. त्यामुळे जनतेचे विषय संसदेत उठविणारे हवेत व आपल्याला काँग्रेसने उमेदवारी द्यावी. सर्व सेक्युलर मतांना एकत्र आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, असा दावा मिकी पाशेको यांनी केला.









