मागणी वाढली, 70 टन विक्री, कोटय़वधींची उलाढाल
प्रतिनिधी / बेळगाव
‘अंधाराकडून प्रकाशाकडे’ नेणाऱया दिवाळी सणात 70 टनाहून अधिक फुलांची यंदा विक्री झाली. यामधून कोटय़वधींची उलाढाल झाली आहे. दिवाळीत झेंडूसह इतर फुलांना अधिक मागणी असते. त्यामुळे त्यांची खरेदी वाढली होती. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा फूल मार्केटमध्ये उलाढाल वाढली आहे.
दिवाळीच्या काळात दररोज 25 टनहून अधिक फुलांची विक्री झाली. विशेषतः पाडव्यादिवशी फुलांची अधिक विक्री झाली. त्यामधून कोटय़वधींची उलाढाल झाली आहे. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर झेंडू, शेवंती, गुलाब, गलाटा आदी फुलांची विक्री झाली आहे. वसुबारसपासून दिवाळीला प्रारंभ झाला, तेव्हापासून फुलांची मागणी वाढली आहे. विशेषतः लक्ष्मीपूजन आणि पाडव्यादिवशी फुलांची उच्चांकी विक्री झाली आहे.
दसरा आणि दिवाळी सणाला फुलांची मागणी व विक्रीही अधिक असते. कोरोनामुळे मागील दोन वर्षात फूल मार्केट थंडावले होते. मात्र, सण-उत्सव पूर्ववत सुरू झाल्याने फुलांची मागणी पुन्हा वाढली आहे. विशेषतः दिवाळीत फुलांची उच्चांकी विक्री झाली आहे. दिवाळीत पहिल्या दिवशी 60 ते 70 रुपये प्रति किलो दराने मिळणारी फुले पाडव्यादिवशी 180 रुपये किलो झाली होती. फुलांची आवक कमी झाल्याने पाडव्यादिवशी दर आवाक्मयाबाहेर गेले होते. विशेषतः झेंडूंचे दर वाढले होते. त्यामुळे काहींनी शेवंतीची फुले खरेदीस पसंती दिली.
आवक मंदावल्याने दरात वाढ…
दिवाळीसाठी फुलांची आवक वाढली होती. त्याबरोबर विक्रीदेखील अधिक झाली आहे. यरगट्टी, निपाणी आदी भागातून फुलांची आवक झाली होती. मात्र, पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पाडव्यादिवशी काही प्रमाणात आवक मंदावली होती. त्यामुळे दरही काहीसे वाढले होते.









