अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना पायावर उभे राहण्याची संधी
बेळगाव : अभियांत्रिकी क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके व इतर ज्ञान आत्मसात करावे लागते. त्यामुळे पुढील जीवनात त्यानी केलेल्या प्रात्यक्षिकेमुळे तांत्रिक क्षेत्रात यश मिळते. त्यामुळे पहिल्या वर्षांपासून विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकल व थेअरीकडे लक्ष देऊन अभ्यास केल्यास आपण पुढील जीवनात यशस्वी बनतो. वसंतराव पोतदार अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण देऊन त्याना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळवून दिली आहे. अभियांत्रिकी शिक्षणाला आता चांगले दिवस आले आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन गौरी हेरेकर (लटकन) यानी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष यु. एन. कालकुंद्रीकर हे होते.
वसंतराव पोतदार अभियांत्रिकी महाविद्यालयाचा वार्षिक बक्षीस वितरण व शेवटच्या वर्षातील मुलांच्या निरोप समारंभावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्राचार्य एस. एस. मालाज, यु. एन. कालकुंद्र्रीकर, प्रमुख पाहुणे गौरी हेरेकर (लटकन), प्रथमेश गुज्जर, नेहा माउली, सुजल आंबेवाडी आदी उपस्थित होते. गौरी लटकन पुढे म्हणाल्या, अभियांत्रिकी क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशामुळे सध्या अभियांत्रिकी शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना केलेल्या प्रात्यक्षिकामुळे अनेक वस्तूंचे संशोधन केले जात आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना आपल्या भावी जीवनात होत आहे. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. प्रा. एस. एस. मालाज यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यू. एन. कालकुंद्रीकर यानी शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थांचा गौरव करून, त्यांना शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रात व क्रीडाक्षेत्रात यश संपादन केलेल्या विजेत्या स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. एचओडी प्रथमेश गुज्जर यांनी आभार मानले.









