आयसीसीचा निर्णय : विजेत्या संघाला मिळणार 40 कोटींचे बक्षीस
वृत्तसंस्था/ मुंबई
भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली 30 सप्टेंबरपासून महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने ऐतिहासिक निर्णय घेत प्राईज मनी तब्बल 297 टक्क्यांनी वाढवली आहे. आयसीसी प्रमुख जय शाह यांनी महिला वर्ल्ड कपसाठी 13.88 मिलियन डॉलर्स (सुमारे 122 कोटी रुपये) रक्कम जाहीर केली आहे. आयसीसी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर जय शाह यांनी महिला क्रिकेटला नवा उंचीवर देण्यासाठी हा मोठा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, महिला विश्वचषकाच्या एकूण बक्षीसाची रक्कम ही 2023 च्या हंगामातील पुरुष वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपेक्षाही अधिक आहे.
आयसीसीने सोमवारी वनडे वर्ल्डकपसाठी बक्षीसाची घोषणा केली. 2022 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या तुलनेत 297 टक्क्यांनी बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली आहे. भारतात होणाऱ्या वर्ल्डकपसाठी 13.88 मिलियन डॉलर्स इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेवेळी बक्षीस रक्कम अवघी 3.5 मिलिअन डॉलर एवढीच होती. याबाबत बोलताना जय शाह म्हणाले, ही घोषणा महिला क्रिकेटच्या प्रवासात एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. बक्षीस रकमेतील चारपट वाढ महिला क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण आहे आमचा संदेश साधा आहे, महिला क्रिकेटर खेळाडूंना हे माहिती असायला हवे की जर त्यांनी हा खेळ व्यावसायिक पातळीवर निवडला, तर त्यांच्याशी पुरुषांसारखी वागणूक केली जाईल. अर्थातच, महिला क्रिकेटला वेगळी उंची प्राप्त होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
महिला विश्वचषकासाठी असणारी बक्षिसाची रक्कम
विजेता संघ – 4.48 मिलियन डॉलर्स (सुमारे 40 कोटी रुपये)
उपविजेता संघ – 2.24 मिलियन डॉलर्स (सुमारे 20 कोटी रुपये)
सेमीफायनलमधील संघ – प्रत्येकी 10 कोटी रुपये
पाचवा व सहावा क्रमांक – प्रत्येकी 6 कोटी रुपये
सातवा व आठवा क्रमांक – प्रत्येकी 2.5 कोटी रुपये
प्रत्येक सहभागी संघाला 2 कोटी 50 लाख रुपये









