राज्यात 2012 साली गाजलेले प्रकरण : डॉक्टरांना दिलासा
पणजी : गोमेकॉत एका अर्भकाच्या हाताला झालेली जखम चिघळून गँगरीन झाल्याने त्याचा हात कापावा लागल्याप्रकरणी त्यावेळी ड्युटीवर असलेले डॉक्टर्स व परिचारिका निर्दोष असल्याने त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा आदेश पणजीच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी काल गुरुवारी दिला. जानेवारी 2012 साली घडलेले हे प्रकरण त्यावेळी राज्यात गाजले होते. बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात एका नवजात बालकाचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार घडला होता. स्मिता गावकर ही महिला या इस्पितळात प्रसूत झाल्यानंतर ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांनी उपचारा दरम्यान त्या अर्भकाच्या हाताला झालेल्या जखमेमुळे गँगरीन झाल्यामुळे त्याचा हात कापावा लागला होता.
आगशी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने भारतीय दंड संहितेच्या कलम-336 व 337 खाली आणि गोवा बाल कायद्याखाली औषधपाणी करताना निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा नोंद केला होता. सदर प्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला आरोपींविऊद्ध बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर हे प्रकरण पणजी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सुनावणीस आले. गोमेकॉने याप्रकरणी अंतर्गत चौकशी केली असून त्यात प्रसूती वॉर्डात त्या दिवशी 32 बालके भरती झाली असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यावेळी फक्त एकच निवासी कनिष्ठ डॉक्टर हजर असून अन्य डॉक्टर्स अन्य कामात गुंतले असल्याचे समजले होते. न्यायमूर्तींनी या अहवालाचा अभ्यास करून डॉक्टर्सकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नसल्याचे मान्य करून कमी स्टाफ, कामाचा बोजा यामुळे सदर प्रकार घडला असल्याचे नमूद केले. त्यामुळे सदर डॉक्टर्स व अन्य स्टाफवरील दाखल करण्यात आलेले आरोपपत्र फेटाळण्यात आल्याचे निर्देश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्या. सबिना आद्रियान ब्रागांझा यांनी दिले आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम-336 व 337 खाली हा गुन्हा जामीनपात्र असून ते प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर चालवण्यास हरकत नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. तसेच अन्य आरोपीवरील आरोपपत्र नाकारून त्यांची सुटका करण्याचा आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिला.








