21 चित्रपटांचे होणार प्रदर्शन : प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा होणार ‘आजीवन कृतज्ञता’ पुरस्काराने सन्मान
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील 13 वा गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे (गोमचिम) चालू आठवडय़ात दि, 5 ते 7 ऑगस्ट असे तीन दिवस आयोजन करण्यात येणार असून त्यात 21 चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. शिवाय मराठीतील सुप्रसिद्ध नामवंत चित्रपट अभिनेता अशोक सराफ यांना ‘आजीवन कृतज्ञता’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
पणजीतील आयनॉक्स चित्रपट संकुलात हा महोत्सव होणार असून तो तीन दिवस चालणार आहे. त्यात 3 चित्रपटांचे जागतिक प्रीमियर शो आखण्यात आले असून राष्ट्रीय पुरस्कार लाभलेल्या चार चित्रपटांचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे.
या महोत्सवाला गोव्यात चांगला प्रतिसाद मिळत असून मराठी चित्रपटातील नामवंत अभिनेता-अभिनेत्री व इतर कलाकार त्यानिमित्ताने गोव्यात येणार आहेत. या महोत्सवात अनेक नावाजलेले मराठी चित्रपट रसिकांना पाहायला मिळणार असून त्यासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरू आहे.
गोव्यातील ‘वाघ्रो’ चित्रपट दाखविणार
गोव्यातील निर्माता साईनाथ उसकईकर व प्रोडय़ुसर राजेश पेडणेकर यांचा ‘वाघ्रो’ हा चित्रपट प्रथमच या महोत्सवात दाखविण्यात येणार आहे. शिवाय डॉ. प्रेमानंद रामाणी यांचा ‘ताठ कणा’ हा माहितीपटही महोत्सवात समाविष्ट करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी महोत्सवाचे उद्घाटन तर रविवारी दि. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी समारोप सोहळा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.









