आतापर्यंत नियुक्त 5198 मध्ये केवळ 443 गोमंतकीय ही फसवणूकच
प्रतिनिधी/ पणजी
मोपा विमानतळ हे गोव्याच्या उत्कर्षाचे इंजिन असल्याची बतावणी करत व लाखो नोकऱया उपलब्ध होऊन गोमंतकीयांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल, अशी आश्वासने देणाऱया सरकारने प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत केवळ 443 नोकऱया गोमंतकीयांना दिल्या आहेत. त्यातील 311 नोकऱया पेडणेतील लोकांना मिळाल्या आहेत. हे प्रमाण नगण्य म्हणण्यासारखे म्हणजेच केवळ 5 टक्के एवढे आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.
शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोपा विमानतळाचे येत्या ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मोपा हा सध्या भाजप सरकारचा प्रमुख प्रकल्प बनला आहे. त्यावरून ते सदैव स्वतःचीच पाठ थोपटत असतात. यापूर्वी काही मंत्र्यांनी मोपा हे सरकारचे उत्कर्षाचे इंजिन आहे, त्यामुळे मोपा सुरू झाल्यानंतर गोमंतकीयांना नोकरीसाठी गोव्याबाहेर जावे लागणार नाही, अशी वक्तव्ये केलेली आहेत, असे सरदेसाई म्हणाले.
आम्ही खासगी क्षेत्रात गोमंतकीयांना 80 टक्के नोकऱया आरक्षित कराव्यात अशी मागणी केली होती. परंतु येथे तर 8 टक्केसुद्धा नोकऱया गोमंतकीयांना मिळत नाहीत, लंडनच्या हिथ्रो विमानतळावरसुद्धा यापेक्षा जास्त गोमंतकीय सापडतील, असे सरदेसाई म्हणाले.
मुख्यमंत्री स्वतः दोन लाख नोकऱया निर्माण होतील, अशा घोषणा करत होते. मात्र विधानसभा अधिवेशनातील एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात आतापर्यंत केवळ 5198 नोकऱया दिल्याचे सांगितले आहे. त्याशिवाय विमानतळ सुरू झाल्यानंतर दीड हजार नोकऱया देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यातील 232 नोकऱया देण्यात आल्या व 1268 नोकऱया देणे बाकी आहेत, अशी सरकारची आकडेवारी सांगते. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत त्यांनी उर्वरित नोकऱया देण्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.
विमानतळावरील नोकऱयांसाठी मनुष्यकौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. त्याकामी पेडणेतील आयटीआयची मदत घेणे शक्य असून जीएमआरच्या संयुक्त विद्यमाने या आयटीआयचा दर्जा वाढवावा, असा सल्ला त्यांनी दिला. मोपा विमानतळाला आपला विरोध नाही असे स्पष्ट करताना मोपावर गोमंतकीय लोक असावे, हीच इच्छा असल्याचे ते म्हणाले.
‘त्या’ राजकारण्यांची नावे जाहीर करा
दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणात ज्या कोणा राजकारण्याचा सहभाग असेल त्याचे नाव जाहीर करून कारवाई करावी, उगीच तिऱहाईताच्या तोंडून आलेल्या नावांवरून प्रत्येकाभोवती संशयाची सूई फिरवू नये, असा सल्ला सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. जमीन बळकावणे चुकीचेच आहे. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. तुम्ही एखादवेळी एखाद्यास मूर्ख बनवू शकता, सदैव सर्वांना मूर्ख बनवू शकत नाहीत, असे सांगून जमीन घोटाळ्याच्या नावाने खळबळ माजवून लोकांची मने विचलित करू नका, असा सल्ला सरदेसाई यांनी दिला.









