राज्याबाहेरून मिरचीची आवक वाढल्याचा परिणाम : यंदा दर नियंत्रणात,स्थानिक मिरची असल्याचे भासवून परप्रांतीयांकडून फसवणूक

डिचोली : पावसाच्या बेगमीची लगबग वाढली आहे. लोक बाजारात बेगमीसाठी गर्दी करू लागले आहेत. बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात लाल मिरचीचे ढीग दिसून येत असल्याने लोकांनीही या मिरचीच्या खरेदीसाठी झुंबड पडायला सुरुवात केली आहे. सध्या आठवडा बाजारात गोव्याबाहेरील लाल मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने स्थानिक मिरचीची मागणी व खरेदीही कमी झाली आहे. लोक शेजारील राज्यातून येण्राया मिरचीलाच जास्त प्राधान्य देऊन खरेदी करत असल्याने स्थानिक मिरचीची विक्री करणाऱ्या महिला हवालदिल बनल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी येणारा मे महिना हा गोमंतकीयांसाठी बेगमीचा महिना असतो. य महिन्यात सर्व प्रकाराच्या वस्तुंची येणाऱ्या वर्षभरासाठी बेगमी केली जाते. तसेच या सर्व गोष्टी केवळ याच महिन्यात तयार होऊन मिळत असतात. बेगमीची चाहूल लागली की सर्वप्रथम लोक लाल मिरचीच्या खरेदीला प्राधान्य देतात. गोमंतकीयांच्या स्वयंपाकघरात लाल मिरचीला मोठे महत्त्व आहे. मासळीच्या कडीसाठी (मशांचे हुमण) या लाल मिरचीच्या मसाल्याला बरेच महत्त्व आहे.
स्थानिक मिरचीचे दर चढे असल्याने बाहेरच्या मिरचीला प्राधान्य
सध्या स्थानिक मिरचींचे दर अनियंत्रित झाल्याने ती खिशाला परवडत नाही. म्हणून काही लोक नाईलाजाने बाहेरील मिरचीला प्राधान्य देतात. बाहेरील मिरचीचे दर हे स्थानिक मिरचीपेक्षा निम्मे असतात. त्यामुळे ते खिशाला परवडतात. म्हणून लोक इच्छा नसतानाही दरांमुळे स्थानिक मिरचीकडे दुर्लक्ष करतात. असे आढळून आले आहे.
यंदा दर नियंत्रणात
गेल्यावर्षी स्थानिक गोमंतकीय मिरचीचे दर एक हजाराच्या वर होते. ते बेगमीचा मोसम संपेपर्यंत खाली आलेच नव्हते. त्यामुळे अनेकांनी बाहेरच्या मिरचीचा पर्याय स्वीकारला होता. प्रारंभीच हे दर रु. 1200 पार होते. नंतर ते 1000 पर्यंत आले होते. यावेळी प्रारंभीच्या काळात हे दर रु. 1 हजारांवर होते. मात्र आता सदर दर कमी झालेले आहे. मये, हरमल, मेणकुरे, इब्रामपूर, काणकोण या भागातील मिरची काल डिचोलीत आठवडा बाजारात विक्रीसाठी आलेली दिसली. सध्या स्थानिक लाल मिरचीचे दर तसे नियंत्रणात आहेत. ते येत्या एक दोन आठवड्यात आणाखीनही कमी होण्याची शक्यता आहे.
मये, हरमल, मेणकुरेच्या मिरचीला लोकांची मागणी.
मिरचीच्या पिकात सदैव अव्वल व चवदार मिरची म्हणून नावलौकिक मिळविलेल्या मये गावातील लाल मिरचीला बाजार त बरीच मागणी असते. मयेतील कष्टकरी महिला ही मिरची घेऊन बाजारात विक्रीसाठी बसलेल्या असतात. लोक त्यांच्याकडे शाश्वतपणे जाऊन मिरची खरेदी करतात. या मिरचीत कोणत्याही प्राकारचा बनावटपणा नसणार याची लोकांना खात्री असते. मयेच्या पाठोपाठ हरमल, मेणकुरे, इब्रामपूर, काणकोण या भागातून येण्राया मिरचीलाही लोक पसंती देतात. दर वरखाली असल्यास लोक मयेव्यतिरिक्त हरमल किंवा मेणकुरेची मिरची खरेदी करण्याची तडजोड करतात.
स्थानिक मिरची 500 रू. च्या वर किलो दराने, तर बाहेरील निम्म्या दराने
सध्या गोव्यात लाल मिरचीची मागणी पाहून मोठ्या प्रमाणात बाहेरची मिरची दाखल झालेली आहे. प्रत्येक ताल्यक्यात आठवडा बाजारात जागा बळकावून हे परप्रांतीय विक्रेते मिरचीचे मोठमोठे ढीग लावतात. त्याकडे लोक लगेच आकर्षित होऊन जातात. सध्या गोव्यातील लाल मिरचीच्या दरांच्या तुलनेत बाहेरील मिरचीचे दर निम्म्याहून कमी आहेत. त्यामुळे लोक गोमंतकीय मिरचीला दुर्लक्ष करून बाहेरच्या मिरचीकडे वळतात. सध्या मयेची मिरची 650, मेणकुरेची 700, इब्रामपूरची 650 रु., हरमलची 650 रु. प्रतिकिलो प्रमाणे आहे. या दरांमध्ये काही ‘वाणपण’ केल्यास 50 – 100 रु. कमी करून दिली जाते. तर जांबोटीची 350 रु., बंदाची 550 रु., गुंटूरची 200 – 220 रु. प्रतिकिलो प्रमाणे दर आहेत.
गोमंतकीय विक्रेत्यांकडूनही फसवणुकीचे प्रकार
दरवर्षी लाल मिरचीला गोव्यात असलेली मोठी मागणी व त्यामुळे होणाऱ्या व्यवसायाचा गोव्यात दरवर्षी परप्रांतीय मिरची विक्रेते गैरफायदा उठवत असतात. त्यात काही गोमंतकीय महाभागांचाही समावेश आहे. जांबोटी किंवा इतरची लाल मिरची आणून ती गोव्यातील कोणत्याही गावाचे नाव घेऊन विकली जाते. त्यामुळे अनेकांची दरवर्षी फसगत होत असते. काही गोमंतकीय विक्रेतेही असे फसवणुकीचे प्रकार करतात व गोमंतकीयांनाच फसवतात. असाही प्रकार समोर आला आहे.
गोमंतकीयांच्या कष्टावर पाणी !
मिरची लागवड करून त्याचे पिक घेण्यासाठी गोमंतकीय लोक बरीच मेहनत घेत असतात. शेतात किंवा पोरसू पद्धतीने लावण्यात येणारी मिरची वाचविण्यासाठी व ती पूर्ण क्षमतेने वाढवून पिक घेण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यानंतर ती कडक उन्हात सुकवून बाजारात आणण्याचे कष्ट घ्यावे लागतात. परंतु, बाजारात आल्यानंतर बाहेरच्या मिरचीमुळे गोमंतकीय मिरचीला दर मिळत नाही. त्यामुळे आमच्या कष्टावर दरवर्षी पाणी फेरले जाते, अशी कैफियत आमठाणे मेणकुरे येथील लक्ष्मी नाईक व सुहासिनी बोर्डेकर या मिरची विक्रेत्यांनी या प्रतिनिधीकडे मांडली.









