प्रागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचा सूर
फोंडा : गोमंतकीय साहित्य क्षेत्रामध्ये प्राचीन काळापासून प्रभावी साहित्य निर्मिती झाली आहे. त्यामध्ये मौखिक साहित्याचाही समावेश आहे. नाट्या, ललित, काव्य, तसेच लघु साहित्यामध्ये गोमंतकीय साहित्यिकांनी कसदार व तेवढेच वाचनीय साहित्य निर्माण केले आहे. अर्थात काळाची पावले ओळखून तयार केलेले साहित्य हे त्या काळच्या मानवी जीवन मानाची साक्ष देणारे आहे, असे मत दै. तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर यांनी व्यक्त केले. ढवळी येथे आयोजित केलेल्या 16व्या प्रागतिक मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. ‘गोमंतकीय साहित्यात गोवा किती?’ याविषयावर झालेल्या या परिसंवादात डॉ. प्राची जोशी, राजू भिकारो नाईक व राजमोहन शेटये यांचा सहभाग होता. साहित्यमूल्य आणि साहित्याचा दर्जा कटाक्षाने सांभाळायला पाहिजे. साहित्य ही अखंड प्रक्रिया असून ती अविनाशी आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती हस्तांतरीत होत असते. पुढील पिढ्यांसाठी त्या त्या कालखंडात निर्माण होणारे साहित्य मार्गदर्शक ठरत असते. त्यासाठी साहित्यिकांना दूरदृष्टी हवी असते. त्यामध्ये परिस्थितीचे प्रतिबिंब आणि वातावरणाची सावली जाणवली पाहिजे, असे सागर जावडेकर पुढे म्हणाले.
डॉ. प्राची जोशी यांनी कथा, कादंबरी सारख्या साहित्य प्रकारातून देश, काल, जीवनमान, अभिव्यक्ती होत असते, असे नमूद केले. गोमंतकीय साहित्याच्या केंद्रस्थानी गोवा प्रदेश आहे. मुळातच इथले वातावरण साहित्य निर्मितीसाठी पोषक आहे. गोमंतकीयांबरोबरच या भूमीत स्थायिक झालेल्या लेखक वर्गाचाही इथल्या साहित्य निर्मितीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच येथील साहित्याला गोमंतकीय मातीचा गंध आहे. धर्मांतरे, पोर्तुगीज राजवट, मानसिक भावावस्था, पिळवणूक, छळवाद, संघर्ष असे अनेक विषय इथल्या प्राचीन साहित्यात आढळतात. गोमंतकीय साहित्याने आपली ओळख सर्वांर्थाने टिकवली आहे, असे त्या म्हणाल्या. राजू भिकारो नाईक यांनी आपले मत मांडताना गोव्यातील पहिली नाट्यालेखिका हिराबाई पेडणेकर, आद्य नाट्यालेखक कृष्णंभट बांदकर महाराज, सखाराम बर्वे असे अवघेच नाट्यालेखक जुन्या काळात गोव्यात होते. मागच्या पिढीतही विष्णू सूर्या वाघ, महाबळेश्वर रेडकर, रमाकांत पायाजी, मधुसूदन बोरकर असे प्रतिभावंत नाट्यालेखक गोव्याला लाभले. कला अकादमीच्या नाट्यास्पर्धेसाठी स्पर्धात्मक नाटके तसेच अनुवादात्मक नाटके लिहिली गेली. नाटक हा क्लिष्ट विषय असला तरी गोव्यात कसदार नाटककार आहेत. गोव्याच्या मुक्तिसंग्रामावर लिहिलेल्या जळता गोमंतक, आज सैरभर सावर, माझ्या मातीचे गायन, वंदे मातरम, रणसावट, दिपाजी राणे, वारस या नाटकांसह अनेक दर्जेदार नाटकांचे त्यांनी विश्लेषण मांडले. राज मोहन शेटये यांनी ललित साहित्य हे मुक्त चिंतनाशी जोडले असल्याचे सांगितले. त्यात भाषिक शैली महत्त्वाची ठरते. भाषेचा सौंदर्यपूर्ण वापर, त्यातील वाङमयाची गोडी वाढवते. ग्रामीण, शहरी, दलित, निसर्ग, स्त्रीवादी अशा विषयांचा समावेश त्यात होतो. गोमंतकीय ललित साहित्यात प्रामुख्याने गोवा हेच प्राधान्य क्रमाने झळकते, गोव्याचे विपुल दर्शन ललित साहित्यामधून दिसते. ललित साहित्यातील गोवा कुठेच हरवलेला नाही. ललित साहित्याचा मागोवा घेतल्या हे साहित्य दर्जेदार आहे, समर्पक आहे. गोमंतकीय प्रकृतीच्या पचनी पडतील आणि सर्व प्रकारच्या साहित्यात आपले अस्तित्व शाबूत ठेवले, असे हे अक्षर विश्व गोमंतकीय साहित्यिकांनी घडवून आणल्याचे त्यांनी नमूद केले.









