मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून घोषणा : घटकराज्यदिनी दोन्ही मान्यवरांना गौरविणार
पणजी : कला, साहित्य, संगीत, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, आदी विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या गोमंतकीय सुपुत्रांना ’गोमंतविभूषण’ पुरस्काराने सरकारकडून गौरविण्यात येते. यंदा या पुरस्काराने लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर आणि शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर या दोघा मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. प्रत्येकी दोन वर्षांनंतर हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. त्याअंतर्गत आतापर्यंत आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, वास्तुविशारद चार्ल्स कुर्रैय्या, चित्रकार लक्ष्मण पै, स्वातंत्र्यसैनिक लँबर्ट मास्कारेन्हास, डॉ. प्रेमानंद रामाणी या मान्यवरांना गौरविण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात कोरोनाचे वातावरण होते. त्यामुळे 2019-20 वर्षासाठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला नव्हता. तो पुरस्कार लोकसाहित्यातील योगदानासाठी खेडेकर यांना देण्यात येणार आहे. तर 2021-22 वर्षासाठीचा पुरस्कार शास्त्रीय संगीतात गोव्याचे नाव अजरामर करणारे गायक पं. प्रभाकर कारेकर यांना देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संशोधन साहित्यातील अग्रणी विनायक खेडेकर
गोवा कला अकादमीत सदस्य सचिवपदी काम केलेले विनायक खेडेकर यांना यापूर्वी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्यातील संशोधनासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या नावावर विपूल साहित्य संपदा असून त्यात प्रामुख्याने गोव्याची लोकसरिता, लोककला, श्रीमान शिरोडे, महाप्रस्थान, नाते अचेतनाचे, गोवा कुळमी, गोमंतकीय लोकभाषा, गोवा संस्कृतीबंध, कथा ऊपड्यांची, गोवा देवमंडल उन्नयन आणि स्थलांतर यासारख्या संशोधन ग्रंथांचा समावेश आहे. त्याशिवाय त्यांनी लोककला आणि लोकवाद्य प्रकारांचेही दस्तावेजीकरण केले आहे.
शास्त्रीय संगीतातील ‘तानसेन’ : पं. कारेकर
नभ मेघांनी आक्रमिले, विलोपले मधू मिलनात या, प्रिये पहा…, यासारख्या एकापेक्षा एक सरस अजरामर गीतांमुळे सर्वदूर कीर्ती पोहोचलेले गोमंतकीय सुपूत्र पंडित प्रभाकर कारेकर यांच्या अद्वितीय सांगितिक कार्याची दखल घेत यंदाच्या ’गोमंतविभूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यापूर्वी मध्यप्रदेश सरकारने त्यांना ’तानसेन’ पुरस्काराने गौरविले आहे. पं. जितेंद्र अभिषेकी, पं. सुरेश हळदणकर, पं. सी. आर. व्यास यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले. देशविदेशात गायनाच्या असंख्य मैफली गाजविलेल्या कारेकर यांनी ’सवाई गंधर्व’ महोत्सवात आपल्या गायनाने श्रोत्यांना भारावून टाकले. त्याशिवाय पु. ल. देशपांडे यांच्या ’शाकुंतल ते सौभद्र’ या कार्यक्रमातूनही त्यांनी सहभाग घेतला. त्यांना यापूर्वी असंख्य पुरस्कार प्राप्त झाले असून त्यात संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराचा समावेश आहे.









