उत्तर प्रदेश सरकारचे गोमंतकीयांना निमंत्रण : तब्बल 45 कोटी भाविक येण्याची शक्यता,13 जानेवारीपासून 45 दिवसांचा महाकुंभ
पणजी : या भूतळावर आयोजित होणारा सर्वात मोठा उत्सव म्हणून यापूर्वीच जागतिक विक्रम नोंद केलेला महाकुंभमेळा यंदा येत्या 13 जानेवारीपासून प्रारंभ होत असून तब्बल 45 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विक्रमी 45 कोटी लोक उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे हा महोत्सव स्वत:चाच विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित करेल. अशा या दिव्य सोहळ्यात गोमंतकीयांनी अभिमानाने सहभागी व्हावे, असे निमंत्रण आम्ही देतो, असे उत्तर प्रदेशचे कारागृह मंत्री दारासिंह चौहान यांनी सांगितले. या महोत्सवाचा प्रचार आणि प्रसिद्धीसंबंधी जगभरात सुरू असलेल्या ‘रोड शो’ चा भाग म्हणून काल गुरुवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी जलशक्तीमंत्री रामकेश निषाद आणि कारागृह खात्याचे विशेष सचिव वैभव श्रीवास्तव यांची उपस्थिती होती.
यंदा विक्रमी महाकुंभमेळा
रोड शो चे आयोजन आणि राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांना महाकुंभमेळाव्याचे निमंत्रण देणे या उद्देशाने सदर शिष्टमंडळ गोव्यात दाखल झाले आहे. तसे पाहता दरवर्षी प्रयागराज उत्तरप्रदेशमध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. त्याच्या दर बाराव्या वर्षी महाकुंभमेळा आयोजित होत असतो. हा सोहळा सुमारे 45 दिवस चालतो. यंदा त्याची व्याप्ती अधिक वाढविण्यात आली असून सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रफळात हा सोहळा होणार आहे.
स्वच्छ, स्वस्थ, सुरक्षित महाकुंभ
संपूर्ण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली होणार असून नुकतेच या सोहळ्याच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले आहे. महाकुंभमेळा हा एक महान आध्यात्मिक महोत्सव तर आहेच, त्याशिवाय तो स्वच्छ, स्वस्थ, सुरक्षित आणि हरित महोत्सव बनविण्याचेही प्रयत्न आहेत.
संपूर्ण तयारी पूर्णत्वाकडे
सध्या या सोहळ्याची तयारी जवळजवळ पूर्णत्वाकडे पोहोचली आहे. जगभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी 2750 सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह अन्य अत्याधुनिक यंत्रणा, निवासासाठी 1,60,000 तंबू, सुमारे 1,50,000 स्वच्छतागृहे, परेड मैदानावर 100 खाटांचे इस्पितळ, तसेच 20 खाटांची अन्य दोन इस्पितळे, त्याशिवाय लष्कराकडून प्रत्येकी 10 खाटांची दोन आयसीयु केंद्रे उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी 24 तास अखंड सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून 291 एमबीबीएस, 90 आयुर्वेदिक डॉक्टर्स, 182 परिचारिका असे कर्मचारी सेवा देणार आहेत.
घाट, पार्किंग सुविधा
महाकुंभमेळाच्या परिसरात 44 घाट असून त्या सर्व भागात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यास येणाऱ्या लोकांची वाहने पार्क करण्यासाठी 101 स्मार्ट पार्किंग सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. तेथे रोज पाच लाख वाहने उभी करता येणार आहेत. दि. 13 जानेवारी अर्थात पौष पौर्णिमेच्या दिवशी गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पहिले पवित्र स्नान होणार आहे. त्यानंतर दि. 14 मकर संक्रांती, दि. 29 जानेवारी मौनी अमावास्या, दि. 3 फेब्रुवारी वसंत पंचमी, दि. 12 फेब्रुवारी माघी पौर्णिमा, या दिवशी पवित्र स्नान होणार आहे. दि. 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर शेवटचे स्नान होऊन महाकुंभमेळ्याची सांगता होईल, अशी माहिती सिंग यांनी दिली.









