प्रतिनिधी / पणजी
गोवा मेडिकल महाविद्यालय व दंत महाविद्यालयात अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींसाठी पदवी आरक्षणाची घोषणा होऊनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. ती करावी आणि पद्व्युत्तर आरक्षण या शैक्षणिक वर्षापासून लागू करावी या मागण्यांसाठी गोमंतक बहुजन महासंघ या संघटनेच्या शिष्टमंडळाने सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पर्वरी कार्यालयात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषय मंजूर करण्यात येईल व त्याची प्रत तुम्हाला पाठविण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासंबंधीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संपल्यावर लागणारा निधी समाज कल्याण खात्याला देण्यात येणार असल्याचे सांगितले. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदनही सादर केले. यावेळी गोमंतक बहुजन महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे, सरचिटणीस भालचंद्र उसगांवकर, माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, माजी सभापती शंभू बांदेकर, सखाराम कोरगांवकर, विश्वनाथ हळर्णकर, सतीश कोरगांवकर, अशोक परवार, मंगेश चोडणकर व विजय केळुसकर उपस्थित होते.
गोमंतक बहुजन महासंघाने पदव्युत्तर आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी मागणी केली होती. दोन्ही मागण्या सरकारने पूर्ण केल्याबद्दल महासंघ समाधानी असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री गोविंद गावडे यांचे आभार मानले.









