वृत्तसंस्था/ सन सिटी (दक्षिण आफ्रिका)
आपले पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकावण्याच्या जवळ पोहोचून वेळोवेळी निराशा पत्करावी लागलेली भारतीय गोल्फर त्वेसा मलिक अखेर सुपरस्पोर्ट लेडीज चॅलेंजमध्ये जेतेपद मिळवून ही उणीव भरून काढण्यात यशस्वी झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील सनशाईन लेडीज गोल्फ टूरच्या या प्रारंभीच्या स्पर्धेत तिने हे यश नोंदविले.
दक्षिण आफ्रिकेत जेतेपद मिळवणारी त्वेसा ही दीक्षा डागरनंतरची दुसरी भारतीय ठरली आहे. दीक्षा डागरने 2019 मध्ये महिलांची दक्षिण आफ्रिकन ओपन जिंकली होती. दीक्षा डागर आणि 2023 मध्ये केनिया लेडीज ओपन जिंकणारी अदिती अशोक यांच्यानंतर आफ्रिका खंडात जिंकलेली त्वेसा ही तिसरी भारतीय महिला गोल्फर आहे.
29 वर्षीय त्वेसा ही मागील सात वर्षांपासून व्यावसायिक खेळाडू म्हणून वावरत आहे आणि भारतात महिलांच्या हिरो प्रो गोल्फ टूरमध्ये अनेक वेळा जिंकलेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गॅब्रिएल वेंटर आणि पाउला रेटो यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान प्राप्त झाले, तर दक्षिण आफ्रिकेची आणखी एक महिला स्टार ली अॅन पेस आणि इंग्लंडची एमी टेलर यांच्या वाट्याला चौथे स्थान आले. दुसऱ्या फेरीनंतर त्वेसा ही पाऊला रेटोसमवेत बरोबरीत होती, पण भारतीय गोल्फरने नंतर मुसंडी मारली.
त्वेसा ही सहकारी भारतीय व्यावसायिक गोल्फर अजितेश संधूशी विवाहबद्ध झालेली आहे. ‘मी कठोर परिश्रम केलेले आहेत आणि टूरमध्ये यशस्वी होण्यावर लक्ष केंद्रीत केले होते. गेले तीन दिवस उत्कृष्ट राहिले, विशेषत: दुसऱ्या फेरीत माझ्या हातून कसलीही चूक घडली नाही. आशा करते की, हा फॉर्म पुढे चालू राहील’, असे ती म्हणाली. त्वेसाने 6 ते 8 मार्च दरम्यान होणाऱ्या सनशाईन लेडीज इनव्हिटेशनल या दुसऱ्या स्पर्धेतही प्रवेश केला आहे.









