जमीन विकास आणि बांधकाम नियमात बदल : नगर-नियोजन खात्याकडून अधिसूचना जारी,जनेतेचे आक्षेप, तक्रारींसाठी 30 दिवसांची मुदत

प्रतिनिधी /पणजी
गोल्फ कोर्स, फिल्म सिटी यासारख्या प्रकल्पांना वाट मोकळी करुन देण्यासाठी सरकारने गोवा जमीन विकास आणि बांधकाम नियमात बदल केले असून नगर-नियोजन खात्याने त्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यावर आक्षेप, सूचना, तक्रारी मागवण्यात आल्या असून त्या करीता 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सदर अधिसूचना जनतेसाठी खुली करण्यात आली आहे.
गोल्फ कोर्स, फिल्म सिटी यासारखे प्रकल्प गोव्यात यावेत म्हणून हा बदल करण्यात आला असून त्यांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश त्यामागे आहे. दोन्ही प्रकल्पांसाठी किमान 1 लाख चौ.मी. जमीन आवश्यक असून हे प्रकल्प नगर-नियोजन खात्याच्या मान्यतेनंतरच पुढे सरकणार आहेत. इंडियन ग्रीन बिल्डींग कॉन्सिलचा परवाना त्यासाठी सक्तीचा करण्यात आला असून गोल्फ कोर्ससाठी 30 टक्के एफएआरला अनुमती देण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
फार्म हाऊस प्रकल्पांना देखील या नवीन सुधारित बदल केलेल्या नियमानुसार परवानगी देण्यात येणार असून 10 हजार चौ.मी. पेक्षा जास्त जागा त्या करीता आवश्य ठरवण्यात आली आहे. फार्म हाऊसचे बांधकाम 500 चौ.मी.च्या आत असावे आणि त्याची उंची 7.6 मीटर्स एवढी निश्चित करण्यात आली आहे. सुधारित नियमाचा हा मसुदा 30 दिवसांकरीता खुला ठेवण्यात आला आहे.
निवासी संकुलांमध्ये 20 टक्के पार्किंग ई-वाहनांकरीता
इलेक्ट्रिक वाहनांना उत्तेजन देण्यासाठी नवीन व नुतनीकरण होणाऱया निवासी – अनिवासी संकुलात 20 टक्के पार्किंग जागा ई-वाहनांकरीता चार्जिंग स्पॉट राखीव ठेवण्यात यावी असे नगर-नियोजन खात्याने म्हटले आहे. निवासी शाळा-योगा केंद्रे यांनाही सरकारने ठराविक क्षेत्रात अनुमती दिली आहे.









