बेळगावच्या सोनाराची 35 लाखांची फसवणूक
कराड : बेळगाव येथील सोनाराला कमी दरात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३५ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणुकी दरम्यान संबंधित सोनाराला कराडच्या मंगळवार पेठेत पडक्या वाड्यात नेऊन मारहाण करून रोख रकमेची बॅग हिसकावून नेण्यात आली. या प्रकरणी कराड शहर पोलिसांत सोनाराने फिर्याद दिली आहे. त्यावरून साईराज बडसकर, अनिकेत शेवाळे (रा. कराड) व अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण आणवेकर (वय ४७, रा. शहापूर, बेळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गेल्या ३० वर्षांपासून सोनारकाम करीत आहेत. त्यांची सुमीत बडसकर यांच्याशी १५ वर्षांपासून ओळख होती. त्याच सुमीतचे नातेवाईक साईराज बडसकरने कराड येथून कमी दरात सोने मिळवून देतो, असे सांगत आणवेकर यांना जाळ्यात ओढले.
पहिल्या भेटीनंतर काही दिवसांनी साईराजने पुन्हा संपर्क साधून ५०० ग्रॅम सोने प्रति तोळा ७० हजार रुपयांना मिळेल, असे सांगून ३५ लाखांत व्यवहार निश्चित केला. आणवेकर यांनी मित्रांकडून उसने पैसे घेतले व काही सोने गहाण ठेवून ३५ लाख रुपये जमवले. १३ ऑगस्ट रोजी ते साईराज व त्याचा साथीदार अनिकेत शेवाळे यांच्या सांगण्यावरून कराड येथे आले. दोघांनी त्यांना एका पडक्या वाड्यात मारहाण करत त्यांच्याकडील ३५ लाखांची बॅग हिसकावून घेतली आणि ते पसार झाले.








