पुरुष रिलेला संघाला सुवर्ण तर महिला संघ रौप्यपदकाचा मानकरी : अविनाश साबळे, हरमिलनचेही रुपेरी यश
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अकाराव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करताना तीन सुवर्ण, पाच रौप्य व चार कांस्यपदकासह एकूण 12 पदकांची कमाई केली. भालाफेक प्रकारात भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करताना सुवर्णपदक जिंकले तर भारताच्याच किशोर कुमार जेनाने रौप्यपदकाची कमाई केली. याशिवाय, 4×400 रिलेत पुरुष संघाने सुवर्ण जिंकत ऐतिहासिक कामगिरी साकारली. महिलांच्या 800 मी शर्यतीत हरमलिन बेन्स, महिलांची 4 बाय 400 रिले तर पुरुषांच्या 5000 मी शर्यतीत अविनाश साबळे यांनी रौप्यपदक पटकावले. विशेष म्हणजे, नीरजने एशियन गेम्सधील दुसरे सुवर्णपदक आहे.नीरज चोप्राला भारताच्याच किशोर कुमार जेनाने सुवर्णपदकासाठी कडवे आव्हान दिले. अखेर नीरजने हंगामातील 88.88 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर किशोर कुमारने देखील आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी (87.54 मीटर) करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
नीरजचा गोल्डन थ्रो, किशोरचीही जोरदार टक्कर
नीरजने आपली सुरुवातच जवळपास 87 मीटर लांब भालाफेक करत केली होती. मात्र पंचांनी तांत्रिक कारण देत ही फेक वैध मानली नाही. त्यामुळे त्याला पुन्हा भालाफेक करावी लागली. त्याने पहिल्या प्रयत्नात 82.38, दुसऱ्या प्रयत्नात 84.49 मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र मायदेशी सहकारी किशोर कुमार जेनाने पहिल्या प्रयत्नात 82.38, दुसऱ्या प्रयत्नात 84.49 मीटर भालाफेक करत दुसरे स्थान मिळवले होते. मात्र त्याने तिसऱ्या प्रयत्नात 86.77 मीटर भालाफेक करत नीरजला मागे टाकले. ही त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी होती. मात्र यानंतर नीरजने आपल्या चौथ्या प्रयत्नात 88.88 मीटर भालाफेक करत आपले अव्वल स्थान मिळवले. यानंतर किशोर कुमारने पुन्हा एकदा कमाल करताना काही मिनिटांपूर्वी आपणच केलेला वैयक्तिक सर्वोत्तम फेकीचा विक्रम मोडला. त्याने चौथ्या प्रयत्नात 87.54 मीटर भाला फेकला. पाचव्या फेकीत जेनाने फाऊल केला तर नीरजने 80.80 मीटर भाला फेकला. सहाव्या फेकीत देखील जेनाचा फाऊल झाला अन् नीरजच्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब झाले. किशोर कुमारने रौप्य तर जपानच्या गेंकी डीनने कांस्यपदक जिंकले.
अविनाश साबळेला रौप्य
आशियाई क्रीडा स्पर्धेत अविनाश साबळेने 5 हजार मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. अविनाशचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक ठरले आहे. याआधी दोनच दिवसापूर्वी त्याने 3 हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. अविनाशने शेवटच्या लॅपपर्यंत तिसरे स्थान ठेवले होते पण अखेरच्या क्षणी त्याने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आणि 13:21:09 सेकंदासह रौप्यपदक पटकावले. बहरीनच्या बिरानूने 13:17:40 सेकंदाची वेळ नोंदवत विक्रमी सुवर्ण जिंकले. तर बहरिनला या प्रकारात कांस्यपदक मिळाले. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील बीडचा रहिवासी असलेल्या अविनाशने यंदाच्या आशियाई स्पर्धेत 1 सुवर्ण व 1 रौप्यपदकाची कमाई करत आपले लक्ष वेधून घेतले आहे.
हरमिलनही रौप्यपदकाची मानकरी
दरम्यान, बुधवारी महिलांच्या 800 मी शर्यतीत भारताच्या हरमिलन बेन्सने 2:03:75 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. अंतिम क्षणी तिने चीनच्या खेळाडूला मागे टाकत ही कामगिरी केली. दरम्यान, श्रीलंकेने या प्रकारात सुवर्ण तर चीनने कांस्यपदक जिंकले. विशेष म्हणजे हरमिलनचे हे या आशियाई स्पर्धेतील दुसरे पदक आहे. याआधी दोन दिवसापूर्वी तिने 1500 मी. शर्यतीत रौप्य जिंकले होते.
पुरुष रिले संघ सुवर्णपदकाचा मानकरी
एशियन गेम्समध्ये पुरुषांच्या 4×400 रिले शर्यतीत भारताने मोठी कामगिरी केली आहे. भारतीय पुरुष संघाने 400 मीटर रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय संघाने 3:01.58 मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर कब्जा केला. मुहम्मद अनस, अमोज जेकब, मुहम्मद अजमल आणि राजेश रमेश या संघाने सुवर्णपदक जिंकले. कतारच्या संघाने रौप्य तर श्रीलंकन संघाने कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या 4×400 रिलेत रुपेरी यश (महिला रिले संघ)
भारतीय महिला संघाने 400 मीटर रिले शर्यतीत रौप्य पदक पटकावले आहे. गेल्या सहा वेळपासून भारत या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत होता. मात्र, यावेळी भारताला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. विथ्या रामराज, ऐश्वर्या मिश्रा, प्राची, सुभा व्यंकटेशन या संघाने रौप्यपदक पटकावले आहे. बहरिनच्या संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
बुधवारचे पदक विजेते
- तिरंदाजी – मिश्र सांघिक, ज्योती-ओजस सुवर्णपदक
- भालाफेक – नीरज चोप्रा, सुवर्ण
- पुरुष 4 बाय 400 रिले – सुवर्ण
- बॉक्सिंग – लोवलिना, रौप्य
- महिला 800 मी शर्यत – रौप्य
- पुरुष 5000 मी शर्यत – अविनाश साबळे, रौप्य
- महिला रिले संघ – रौप्य
- भालाफेक – किशोर जेना, रौप्य
- कुस्ती – सुनील कुमार, कांस्य
- बॉक्सिंग – परवीन हुडा, कांस्य
- स्क्वॅश – मिश्र दुहेरी, कांस्य
- 35 किमी चालण्याची शर्यत – मंजू रानी, रामबाबू, कांस्य.
एशियन गेम्समध्ये भारताने रचला इतिहास
आशियाई स्पर्धेत भारताने आतापर्यंत 18 सुवर्ण 31 रौप्य व 32 कांस्यपदकासह एकूण 81 पदकांची कमाई करत चौथे स्थान मिळवले आहे. या कामगिरीसह भारताने आतापर्यंतच्य आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. पहिल्या 10 दिवसांत 69 पदके जिंकणाऱ्या भारताने 11 व्या दिवशी 71चा जादुई आकडा गाठला आणि सर्व जुने विक्रम मोडीत काढले. आशियाई क्रीडा स्पर्धा 1951 मध्ये सुरू झाली. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धा या दिल्ली येथे झाल्या होत्या आणि यजमान भारताने एकूण 51 पदके जिंकली. पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर होता. मात्र, यानंतर भारताला 50 पदके मिळविण्यासाठी 31 वर्षे वाट पाहावी लागली. 1982 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 13 सुवर्णांसह 57 पदके जिंकली होती. यंदा मात्र भारताने अनेक क्रीडा प्रकारात अंतिम फेरी गाठली असून हा आकडा शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.









