ऑलिंपिकविजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची केलेली कामगिरी ही निश्चितपणे ऐतिहासिकच म्हटली पाहिजे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जात असला, तरी भारतात क्रिकेटला जे ग्लॅमर आहे, ते अन्य कोणत्याही खेळाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे चौकार, षटकारांची आतषबाजी, शतकी धडाका, भेदक गोलंदाजी, सूर मारून घेतलेले झेल अन् चपळ क्षेत्ररक्षण अशा क्रिकेटमधील सर्वच पैलूंवर भरभरून चर्चा करण्यास भारतीयांना विशेष आवडते. किंबहुना, मागच्या काही वर्षांपासून क्रिकेटवरचा हा फोकस अन्य खेळांवर व खेळाडूंवरही वळल्याचे सुखद चित्र पहायला मिळते. अर्थात याचे श्रेय प्रामुख्याने अन्य विविध क्रीडाप्रकारांमधील खेळाडूंच्या अतुलनीय कामगिरीलाच द्यावे लागेल. खरे तर भालाफेक नावाचा कोणता क्रीडाप्रकार आहे नि तो ऑलिंपिकमध्ये खेळला जातो, हे फारसे कालपरवापर्यंत कुणाच्या गावीही नसावे. पुराणकाळात युद्धामध्ये वापरले जाणारे एक प्रमुख अस्त्र, हीच काय ती त्याची ओळख. तथापि, नीरज चोप्रा नावाच्या भारताच्या सुपुत्राने जागतिक स्पर्धेतही सुवर्णफेक करीत या खेळाला एक नवे परिमाण मिळवून दिल्याचे दिसते. नीरजचा आजवरचा प्रवास तसा थक्क करणाराच म्हणायला हवा. हरियाणातील पानिपतमधील एका छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. मात्र, कोणत्याही अडीअडचणींचा बाऊ न करता संघर्षशील राहण्याच्या वृत्तीतूनच या 25 वर्षीय भालाफेकपटूने येथवर मजल मारल्याचे पहायला मिळते. तसे 2012 पासूनच ज्युनिअर चँपियनशीप वा तत्सम स्पर्धांच्या माध्यमातून त्याने आपले लक्ष वेधून घेतले. किंबहुना, 2016 पासून त्याने आपल्या खेळात दाखविलेले सातत्य स्तिमित करणारे ठरते. या वर्षी त्याने आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक तसेच रौप्यपदकाची कमाई करीत आपली चुणूक दाखवून दिली. तर दक्षिण आशियाई स्पर्धेतही त्याने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 2017 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील त्याची सुवर्णफेकही अशीच अफलातून. त्यानंतर 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा व आशियाई क्रीडा स्पर्धा या दोहोंमध्ये त्याने हाच कित्ता गिरविला. अर्थात तोपर्यंत नीरज हे नाव फार कुणास माहीत असण्याचे कारण नसावे. त्याने भारतासह अवघ्या जगाचे लक्ष वेधले, ते 2020 मध्ये जपानमधील टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेद्वारे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने या सुवर्णवीराने आपल्या पराक्रमाने गाजविली, असे नक्कीच म्हणता येईल. या स्पर्धेत 87.58 मीटर अशा सर्वोच्च अंतरासह त्याने मिळविलेले सुवर्णयश किती बावन्नकशी होते, याचा अनुभव आज आपण सारे घेत आहोत. कोणत्याही क्रीडापटूकरिता यश टिकविणे, ही अतिशय कठीण बाब असते. प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊ न देता सतत पाय जमिनीवर ठेवणे, हे येरागबाळ्याचे काम नाही. नीरजने हे साध्य केले, हे त्याचे मोठेपण. ऑलिंपिकनंतर जागतिक स्पर्धेतही त्याने नोंदविलेल्या 88.17 मीटर कामगिरीतून त्याचा दर्जा दिसतो. खेळाप्रतीची असीम निष्ठा, प्रचंड मेहनत व कमालीची एकाग्रता यातूनच त्याने हे यश मिळविले, असे नक्कीच म्हणता येते. वास्तविक भारताचे जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरावे. यापूर्वी 2003 मध्ये लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज हिने कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर नीरजनेच गतवर्षी रौप्य प्राप्त केले. आता सुवर्णची कसरही त्याने भरून काढली, हे आनंददायी तितकेच प्रेरणादायीही. ऑलिंपिक व जागतिक स्पर्धेतील कामगिरीनंतर त्याची गणना सार्वकालिक सर्वश्रेष्ठ भालाफेकपटूमध्ये केली जात असली, तरी नीरजने प्रांजळपणे ती नाकारली आहे. हा मान यान झेलझ्नीचा असून, त्याच्या नावावर भालाफेकीत 98.48 मीटरचा विक्रम असल्याकडे त्याने लक्ष वेधले आहे. त्याचबरोबर मी सर्व काही साध्य केलेले नाही. भविष्यात माझे लक्ष्य 90 मीटरचे असेल, हा त्याचा ध्यास बरेच काही सांगून जातो. स्वाभाविकच पुढच्या ऑलिंपिकमध्येही त्याच्याकडून अपेक्षा असतील. सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजने पाकिस्तानच्या रौप्यपदकविजेत्या अर्शद नदीमला आपल्यासह छायाचित्र घेण्यासाठी निमंत्रित करणे व एकत्रित छायाचित्र काढणे, यातूनही त्याच्यातील वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. तर नीरज आणि माझ्यात निकोप स्पर्धा आहे. भारत-पाक असा संघर्ष नाही. आम्ही एकमेकांचा आदर करतो, या अर्शदच्या भावना त्याच्यातील प्रगल्भत्वच दाखवून देतात. मागच्या काही वर्षांपर्यंत भालाफेकीवर युरोपचे वर्चस्व होते. आता आशियाई देशांनी त्यावर पकड मिळविणे, हे नवे वळण म्हटले पाहिजे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही नीरजचे कौतुक केले असून, भारत लवकरच क्रीडा क्षेत्रात अग्रेसर होईल, असे भाकीत वर्तविले आहे. क्रिकेटशिवाय बॅडमिंटन, शूटिंग, कुस्ती, बुद्धिबळ अशा वेगवेगळ्या खेळातील भारतीयांची कामगिरी पाहता आज ना उद्या क्रीडा जगतात आपण वरचष्मा मिळवू शकतो, असे म्हणण्यास वाव आहे. गेल्या काही दिवसांत जागतिक पटलावर भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरीची नोंद केली आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत 18 वर्षीय प्रज्ञानंदने उपविजेतापर्यंत धडक मारत मॅग्नस कार्लसनला टक्कर देण्याची दाखविलेली धमक अजोडच. एच. एस. प्रणॉयने जागतिक बॅडमिंटनमध्ये मिळविलेल्या कांस्यपदकाचे मोलही मोठे होय. असे असले, तरी भारतातील क्रीडा सुविधा पुरेशा आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. ऑलिंपिक वा तत्सम स्पर्धांमध्ये मोठी चुरस असते. त्यात टिकायचे असेल, तर प्रशिक्षणापासून ते साधन सुविधांपर्यंत खेळाडूंची प्रत्येक बाजू भक्कम हवी. त्यादृष्टीने सरकारने आगामी काळात क्रीडा क्षेत्राकरिता अधिकची तरतूद करणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर पालकांनीही खेळाकडे करियर म्हणून पहायला हवे. योग्य वयात मुलांमधील गुण हेरून त्यांना प्रोत्साहन दिले, तर निश्चितपणे त्यातून नीरज, प्रज्ञानंद निर्माण होऊ शकतात.








