विविध मान्यवरांचा सत्कार : सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प : तालुक्याच्या दुर्गम भागातही रुग्णसेवा
खानापूर : लायन्स क्लबने खानापूरसारख्या दुर्गम तालुक्यात 50 वर्षांपूर्वी समाजसेवेला सुरुवात केली. हे व्रत 50 वर्षे अखंड सुरू ठेवणे कौतुकास्पद आहे. येथील क्लबचे कार्य पाहता कार्यकर्त्यांची सामाजिक बांधिलकी वाखाणण्यासारखी आहे. दुर्गम तालुक्यात आरोग्यसेवा सुरळीत नसताना या भागातील जनतेची केलेली रुग्णसेवा ईश्वरसेवेसमान आहे. अशीच सेवा यापुढेही लायन्स क्बलच्या माध्यमातून घडत राहावी, असे उद्गार प्रा. अशोक दास यांनी लायन्स क्लबच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष एम. बी. हमण्णावर होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर डॉ. हेरवाडकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून अपंगांना शिलाई मशीन, कुबड्या यासह खुर्च्या प्रदान करण्यात आल्या. सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या नियोजन कमिटीचे अध्यक्ष डॉ. डी. पी. वागळे यांनी लायन्स क्लबच्या स्थापनेपासून सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंतचा आढावा घेतला. मान्यवरांच्या हस्ते लायन्स क्लबच्या वाटचालीच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ. वागळे म्हणाले, खानापूरसारख्या तालुक्यात 50 वर्षांपूर्वी लायन्स क्लबने समाजसेवेच्या कार्याला सुरुवात करून तालुक्यातील विविध गावात बसथांबे, शुद्ध पाण्याची सोय, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे आयोजित करून हजारो लोकांना लाभ मिळवून दिला आहे. तालुक्यात पहिली ऑटोरिक्षा लायन्स क्लबने अपंग व्यक्तीला दिली होती. तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून मदतीचा हात दिलेला आहे. तालुक्यात वृक्षारोपणच्या माध्यमातून समाजात वनीकरणाचे महत्त्व पटवून देऊन झाडे लावा, झाडे जगवा अभियान राबविण्यात आले. दंतचिकित्सा शिबिरे आयोजित करून रुग्णांची सेवा केली. सामाजिक कामांतून लायन्स क्लबने आपले योगदान दिले. यावेळी तालुक्यातील सामाजिक योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. लायन्स क्लबचा अध्यक्ष म्हणून सेवा केलेल्या माजी अध्यक्षांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तांत्रिक शिक्षणात विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या प्रणव पाटील याचा सत्कार करण्यात आला. लायन सुगला यळमळी, जे. एफ. ब्रिटो, श्रीकांत मोरे, मनोज माणिक आणि जय नाईक यांनी विचार मांडले. यावेळी सातारा येथील संजय घाटगे व विवेक घाटगे यांचा गाणी कमाल खेळ धमाल हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. या बहारदार कार्यक्रमाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. हा सुवर्णमहोत्स्व यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे सभासद अजित पाटील, प्रकाश गावडे, भाऊ चव्हाण, एम. जी. कुमार, एम. जी. बेनकट्टी, महेश पाटील, प्रकाश बेतगावडा, चंबाण्णा होसमणी, ब्रम्हानंद कोचेरी, अॅङ मदन देशपांडे, डॉ. डी. पी. वागळे, डॉ. राधाकृष्ण हारवाडेकर, जुनेद तोपिनकट्टी, निरंजन पाटील, विकास कळ्ळीमणी, सागर उप्पीन, संभाजी पाटील, कल्लाप्पा घाडी, राकेश बेळगुंदकर आदींनी परिश्रम घेतले.









